मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात सोमवारपासून राजकीय, सामाजिक,धार्मिक अशा सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही कार्यक्रम घेता येणार नाहीत. तसेच मिरवणुका, मोर्चे काढता येणार नाही. तसेच यात्रांनाही मनाई असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ऑनलाइन लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना “राज्यात लॉकडाऊन पाहिजे की नको, ते तुम्हीच सांगायचे आहे. म्हणजे तुम्ही आता कसे वागता ते आम्ही पाहू आणि तुमच्या वागण्यावर लॉकडाऊनचा निर्णय घेणार. जे मास्क घालून फिरतात त्यांना लॉकडाऊन नको, जे मास्कविना फिरतात, त्यांना लॉकडाऊन पाहिजे, असे समजले जाईल” अशी घोषणाही केली.
राजकीय पक्ष वाढवा, कोरोना नको!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजकीय पक्षांनाही बजावले आहे की, “तुम्ही तुमचा राजकीय पक्ष नक्की वाढवा, पण कोरोना वाढवू नका.”
मुख्यमंत्र्यांचे संदेश
- “मास्क वापरा-लॉकडाऊन टाळा”
- “जबाबदारीनं वागा, लॉकडाऊन टाळा”
- “कोरोनाविरोधात आता मी जबाबदार” असे प्रत्येकाने मानावे
असे संदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
दुसरी लाट काही दिवसात कळेल
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात कोरोना डोके वर काढत आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे आता आपल्याला काळजी घ्यावीच लागेल. कोरोनाची दुसरी लाट राज्यात आली की नाही हे पुढील आठ – पंधरा दिवसात कळेल, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. या लाइव्हमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांनी आवश्यक पावलं उचलावीत, पण अचानक काही जाहीर करू नये, अशी सूचनाही केली.
आता थोडंसं बंधन तुमच्यावर आणणं गरजेचं आहे. त्यानुसार सोमवारपासून सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर बंदी असणार, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी राजकीय पक्षांनाही बजावले आहे की, तुम्ही तुमचा राजकीय पक्ष नक्की वाढवा, पण कोरोना वाढवू नका.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
- कुणी आपल्याला घरात बंद करून ठेवणं हे कुणालाही आवडणार नाही. पण त्यासाठी आपल्याला जबाबदारीनं वागावं लागेल.
- पुढील दोन महिन्यात आणखी एक- दोन कंपन्या आपल्याला लस उपलब्ध करून देणार आहेत.
- लसीकरणाचे कोणतेही साईडइफेक्ट नाहीत, हे लक्षात घ्या.
- लवकरच सर्वसामांन्यांना लस मिळणार. आतापर्यंत नऊ लाखांच्या आसपास लसीकरण झाले आहे.
- मास्क हीच आपली करोनाच्या लढाईतली ढाल आहे. त्यामुळे लस घेण्या अगोदर व नंतरही मास्क घालणं अनिवार्य आहे.
- शिस्त पाळणं हे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा.
- नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई होणार, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बजावले आहे.