मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात होत असल्याची माहिती केंद्र सरकारने कळवले आहे. राज्य सरकारने कोरोनाबाधितांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, असेही सुचवण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना पत्राद्वारे हे कळवले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडते आहे. चिंता वाढवणारी बाबा अशी की राज्यात गेले काही दिवस सातत्याने दिवसाला १५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. म्हणजे देशात एका दिवसात जेवढे कोरोना रुग्ण सापडतात, त्यातील ५० टक्क्यापेक्षा जास्त रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत त्यामुळेच राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी दिले आहेत.
केंद्र सरकारने सुचवल्यानुसार, कोरोना रुग्णांच्या ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगची यंत्रणा अधिक योग्य पद्धतीने राबवावी लागणार आहे. मात्र, नागरिकांनीही जबाबदारीनं वागणं अपेक्षित आहे. तसे घडत नसल्याने सातत्याने संसर्गाचे प्रमाण वाढतेच आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाची भयावह स्थिती आकड्यांमध्ये:
(सोमवार, १५ मार्चची आकडेवारी)
- सोमवारी राज्यात १५,०५१ नवीन रुग्णांचे निदान.
- सोमवारी १०,६७१ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात सोमवारी एकूण १,३०,५४७ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात सोमवारपर्यंत एकूण २१,४४,७४३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.०७ % एवढे झाले आहे.
- राज्यात सोमवारी ४८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण ४८ मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.२७ % एवढा आहे.
- सोमवारपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७६,०९,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,२९,४६४ (१३.२३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,२३,१२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- ६,११४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.