मुक्तपीठ टीम
महादेव जानकर आता पुन्हा आक्रमकरीत्या सक्रिय झाले आहेत. परतल्यानंतरचा त्यांचा आक्रमक बाणा फक्त सत्ताधारी आघाडीविरोधात नसून त्यांच्या एनडीएमधील मित्रपक्ष भाजपालाही खुपणारा आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आज महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पार्टीने महाराष्ट्रभर निदर्शने केली. त्यावेळी बोलताना जानकरांनी ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा दिला. त्याचवेळी त्यांनी मारलेला “एनडीए असो की यूपीए…ओबीसींना न्याय मिळालेला नाहीच” असा टोला चर्चेचा विषय झाला आहे.
ओबीसी राजकीय आरक्षण रक्षणासाठी रासपाही मैदानात
- ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार निदर्शने करण्यात आली.
- मुंबईत महादेव जानकर यांच्या नेतृत्वात रासपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मानखुर्दला चक्काजाम आंदोलन केलं.
- सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द केलं आहे.
- त्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत.
- ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही.
जातीनिहाय जनगणनेची महादेव जानकरांची मागणी
- ओबीसी जातींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे.
- त्यांच्या लोकसंख्येनुसार त्यांना निधी मिळाला पाहिजे.
- ओबीसींना त्यांची आर्थिक आणि सामाजिक भागीदारी मिळाली पाहिजे.
- एनडीए असो की यूपीए…ओबीसींना न्याय मिळालेला नाहीच
मुक्तपीठ विश्लेषण
- महादेव जानकरांच्या वक्तव्यावरून त्यांचा प्रयत्न भाजपालाही त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करुन देण्याचा असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
- “एनडीए असो की यूपीए…ओबीसींना न्याय मिळालेला नाहीच” हे त्यांचे विधान ओबीसी समाजाला त्यातही त्यांच्या धनगर समाजाच्या मनाला भिडणारे आहे, कारण धनगर समाजाच्या पाठिंब्याचा भाजपाचा चांगलाच फायदा झाला. मात्र, त्या समाजाची मागणी काही पूर्ण झाली नाही.
- भाजपाने आधी डॉ.महात्मे यांना खासदार आणि त्यानंतर गोपीनाथ पडळकरांना आमदार बनवून धनगर समाजामध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्व तयार करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
- भाजपाने विधानसभा निवडणुकीत चलाखीनं रासपाच्या उमेदवारांनी कमळाचा बी फॉर्म दिल्याचेही जानकरांना खटकले होते.
- त्यामुळे यूपीए म्हणजे आघाडीसोबतच एनडीए म्हणजे भाजपालाही दोष देऊन जानकरांनी आपलं वेगळं अस्तित्व दाखवून दिलं असावं.
- भाजपा नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जातीनिहाय जनगणनेला प्रतिकुल मत व्यक्त केले असताना जानकरांनी थेट तीच मागणी करणे, उपद्रवक्षमता दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो.