मुक्तपीठ टीम
डॉलर म्हणजे अमेरिकन चलन. जगाच्या व्यापाराचं माध्यम. डॉलर हा वधारत राहतो आणि आपला रुपया पडतो. यावेळी मात्र बातमी आली ती डॉलरला फटका बसत असल्याची. अर्थात ती आली आहे, शेअर बाजारातून! आणि हा डॉलर अमेरिकन चलन नाही तर भारतीय इनरवेअर ब्रँड आहे!
इनरवेअर बनवणाऱ्या डॉलर इंडस्ट्रीजला सप्टेंबरच्या तिमाहीत मोठा तोटा सहन करावा लागला आहे. या तिमाहीत कंपनीची विक्री घसरली आहे. ही विक्री १२.४८% ने घसरून ३४१.९२ कोटी रूपये झाली आहे. त्याच वेळी, डॉलर इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा सप्टेंबर २०२१ ला संपलेल्या तिमाहीत ४३.७६ कोटी रुपयांच्या तुलनेत ६०.४९% ने घटून १७.२९ कोटी रुपये झाला आहे.
डॉलर कंपनीच्या स्टॉकची स्थिती
- डॉलर इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत ६.०८% ने खाली आली.
- आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शेअरची किंमत ४५४.३० रुपये होती.
- त्याच वेळी बाजार भांडवल २ हजार ५७५ कोटी रुपये राहिले.
- या वर्षी २० जानेवारीला शेअरची किंमत ६६५.७० रुपये होती, तर गेल्या वर्षी २० डिसेंबरला शेअरची किंमत ३९७.३० रुपये होती.
डॉलर इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापनाने भारतीय होजरी क्षेत्रातील सुस्तीला कामगिरीचे श्रेय दिले. कापूस आणि धागा यासारख्या इनपुट साहित्याच्या किंमतीतील चढउताराचा फटका या क्षेत्राला बसत आहे. कापूस आणि धाग्याच्या किंमतीत सातत्याने घसरण झाल्यामुळे या तिमाहीत कंपनीला मोठ्या प्रमाणात इन्व्हेंटरी तोटा सहन करावा लागला. हे तात्पुरते असल्याचे डॉलर इंडस्ट्रीजचे म्हणणे आहे. कंपनीकडे सध्या आठ ब्रँड आउटलेट्स आहेत आणि चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस अशी २० ते २५ स्टोअर्स उघडण्याची त्यांची योजना आहे.