मुक्तपीठ टीम
अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम अगदी जोरात सुरू आहे. मंदिराच्या तळमजल्याचे बांधकाम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करून गर्भगृहात प्रभू रामाला विराजमान करण्याच्या उद्देशाने काम केले जात आहे. त्याचवेळी, रामजन्मभूमी मंदिर उभारणीच्या कामाचा नुकताच एक लाइव्ह व्हिडीओ समोर आला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे मंदिर उभारणीच्या प्रगतीची माहिती देश आणि जगातील भक्तांना वेळोवेळी दिली जाते. यावेळीही ट्रस्टने पुन्हा एकदा आपल्या ट्विटर हँडलवर निर्माणाधीन राम मंदिराचा व्हिडीओ शेअर केला आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या वतीने शेअर केलेल्या २८ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये राम सीतेच्या नामाच्या गजरात मंदिर उभारणीची भव्यता दाखवण्यात आली आहे. मंदिराच्या तळापासून ते खांब बसवणे, त्यांना जोडणे, दगडांचे कोरीव काम इत्यादी गोष्टी व्हिडीओमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.
श्री राम जन्मभूमि मंदिर निर्माण कार्य की वर्तमान स्थिति
Present status of Mandir construction at Shri Ram Janmabhoomi pic.twitter.com/7rNFHk38fF
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) December 15, 2022
अयोध्येत मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू!
- श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचा अंदाज आहे की मंदिर डिसेंबर २०२३ पूर्वी तयार होईल.
- मंदिर समितीच्या दोन दिवसीय बैठकीत बांधकामाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर नुकतीच चर्चा झाली.
- बैठकीच्या अध्यक्षस्थानी बांधकाम समितीचे सभापती नृपेंद्र मिश्रा होते.
- बैठकीनंतर त्यांनी मंदिर बांधकामाच्या जागेची पाहणी करून आतापर्यंतच्या बांधकामाच्या प्रगतीची माहिती घेतली.
- बैठकीत रामाची मूर्ती मंदिरात पोहोचवण्यावरही चर्चा झाली.
राममंदिराचे विश्वस्त डॉ.अनिल मिश्रा यांनी सांगितले की, “आम्ही वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून देश आणि जगातील भक्तांना मंदिराच्या प्रगतीची माहिती देत असतो. आतापर्यंत राम मंदिराचे ६० टक्के काम पूर्ण झाले. त्याच बरोबर १३ फुटांपर्यंत गर्भगृह देखील तयार आहे. भिंत बांधण्याचे कामही याच महिन्यात सुरू होणार आहे. “