मुक्तपीठ टीम
राज्य सरकारने एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी वेतनवाढीची घोषणा केली. यानंतर राज्य सरकारच्या घोषणेचे स्वागत करत एसटी कर्मचाऱ्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनाचे नेतृत्व करत असलेले भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून काढता पाय घेत असल्याची घोषणा केली. पहिला टप्पा जिंकला आहे. न्यायालयीन निर्णयानंतर दुसऱ्या टप्प्याचं आंदोलन असेल तर सोबत असू, असे सांगत त्या नेत्यांनी मैदान सोडले. पण त्याचवेळी न्यायालयीन प्रकरणात बाजू मांडत असलेले अॅड गुणरत्न सदावर्ते मात्र न्यायालयाबाहेर नेतेगिरीच्या आवेशात मैदानात आले आहेत. नेत्यांवर टीका करत विलीनीकरणासाठी आंदोलन डंके की चोट पे असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
खोत आणि पडळकरांना आंदोलनातून आझाद केले
- या आंदोलनाचे सुरुवातीपासून नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी या आंदोलनातून बाहेर पडत असल्याचे सांगितले.
- त्यानंतर तात्काळ या आंदोलनाचे नेतृत्व आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या ताब्यात घेतल्याचे दिसले.
- सदावर्ते यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. खोत आणि पडळकरांनी पोलिसांच्या गराड्यात पत्रकार परिषद घेतली.
- तेव्हा तुम्ही काय ते समजून घ्या.
- त्यांना सरकारने आपल्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले.
- या खोत आणि पडळकरांना आम्ही आंदोलनातून आझाद केले आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा इशारा
- सदावर्ते म्हणाले की, एस. टी. कामगारांची ही लोकचळवळ आहे.
- हा खोत-पडळकर यांनी एकट्यांनी पुकारलेला लढा नाही.
- कामगार नेते दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर ७० वर्षांनी ही अभूतपूर्व लोकचळवळ सुरू आहे.
- सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी स्वतःसाठी या आंदोलनाला स्थगिती दिली.
- आम्ही विलीनीकरणासाठी डंके की चोट पे, हे आंदोलन सुरूच ठेवू.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या या इन्स्टिट्यूशनल मर्डर
- आजापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या या इन्स्टिट्यूशनल मर्डर आहेत.
- आमचे मित्र संजय राऊत लेखनी चालवतात.
- त्यांनी एकदा तरी आपल्या रोखठोकमधून या संपाच्या बाजूने लिहावे.
- राऊत यांनी आंदोलकांच्या बाजूने भूमिका घेऊ नये, हे लज्जास्पद आहे.