मुक्तपीठ टीम
‘भिक्षां देही’ म्हणून भिक्षा सहजपणे मिळविणाऱ्या वर्गातील काही लोकांना स्वातंत्र्यही असेच भीक मागून सहज मिळाले असे आता वाटू लागले आहे,अशा बोचऱ्या शब्दात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्त्यव्याचा समाचार घेतला आहे. भीक मागून स्वातंत्र्य मिळत होते तर किमान ही भीक मागायला तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रस्त्यावर उतरण्याऐवजी शाखांमध्ये का लपून बसला होता,असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
“भीक मागून ब्रिटिशांकडून माफी मिळवता येते, पेंशन मिळते,हे देशाने पाहिले आहे. देशाला स्वातंत्र्य हजारोंचे बलिदान आणि त्यागातून मिळाले आहे. महात्मा गांधी आणि कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली देशाचा हा स्वातंत्र्य लढा लढला गेला,” असे स्पष्ट प्रतिपादन युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी केले.
अभिनेत्री कंगना रनौत यांनी स्वातंत्र्य लढ्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे समर्थन करण्याची ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची कृती देशद्रोही असून त्यांच्या या वक्तव्याचा मी तीव्र शब्दांत निषेध नोंदवतो,अशी संतप्त भावना कुणाल राऊत यांनी व्यक्त केली.
कुणाल राऊत यांनी कंगना रनौत यांच्या वक्त्याव्यविरुद्ध अलीकडेच पोलिसात तक्रार केली असून रनौत यांच्या अटकेची मागणी केली आहे. कंगना यांच्याविरुद्ध देशद्रोहाची कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. गोखले यांच्याविरुद्धही अशीच तक्रार दाखल करून त्यांच्याविरुद्ध राष्ट्रपुरुषांचा अपमान करणे, स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांचा अपमान करणे, भावना दुखावणे आदी कृत्यांसाठी गुन्हा नोंदविण्याची मागणी लवकरच करणार असल्याचे त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. कुणाल राऊत हे सध्या प्रदेश काँग्रेसच्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी ते आज धुळे
नंदूरबार येथे आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भावना व्यक्त केली.
” विक्रम गोखले हे त्यांच्या कसदार अभिनयासाठी ओळखले जातात. अभिनय कसदार असलेल्या व्यक्तीचे विचार इतके हिणकस आहेत, हे ऐकून स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचा नातू म्हणून मला धक्का बसला. गोखले यांच्या कलेवर प्रेम करणाऱ्या अनेकांना या वक्तव्यामुळे अतिव दुःख झाले आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावरच देश स्वतंत्र झाला,असे गोखले यांना वाटत असल्याचे ते म्हणत आहेत. स्वातंत्र्यवीर फाशीवर जात असताना त्यांना वाचविण्यासाठी कुणी काही केलं नाही असे गोखले म्हणत आहेत. मोदी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे पंतप्रधान झाले त्या संघाने स्वातंत्र्यवीर फाशी जात असताना त्याना वाचविण्यासाठी काय केले? त्यांच्या फाशीचा निषेध नोंदविण्याचे धाडस तरी त्यांनी दाखवले का? सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेविरुद्ध ब्रिटिशांनी खटले दाखल केले तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेकांनी लढले. रा. स्व. संघाचे लोक किमान ही न्यायालयीन लढाई लढण्याची हिंमत का दाखवू शकले नाहीत? असे प्रश्न गोखलेंना कधी पडणार?” असे राऊत यांनी विचारले.