मुक्तपीठ टीम
काश्मीरमधील शोपियानमध्ये मंगळवारी दोन काश्मिरी पंडितांवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये एकजण मरण पावला तर अन्य एकजण जखमी झाला आहे. हिंदूच्या हत्येनंतर, काश्मिरी पंडित संघर्ष समितीने (केपीएसएस) खोऱ्यात राहणाऱ्या सर्व काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडण्याचे आवाहन केले आहे. केपीएसएसचे अध्यक्ष संजय टिक्कू यांनी सांगितले की, खोऱ्यातील आणखी एका काश्मिरी हिंदूवर झालेल्या हल्ल्याने हे सिद्ध झाले आहे की, काश्मीरमध्ये राहणार्या प्रत्येक काश्मिरी पंडिताला मारण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. अशा परिस्थितीत पंडितांनी काश्मीर खोरे सोडून दुसरीकडे जाण्याचा विचार करावा, अन्यथा दहशतवादी आपल्या सर्वांना ठार मारतील.
केपीएसएस ही काश्मिरी पंडितांची संघटना आहे, ज्यांनी काश्मीरमधील दहशतवादी हिंसाचाराच्या कळस गाठला गेला होता तेव्हाही काश्मीरमधून स्थलांतर केले नाही. अलीकडच्या काळात काश्मिरी पंडितांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. केपीएसएस प्रमुख संजय टिक्कू म्हणाले की, काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर दहशतवाद्यांनी केलेल्या आणखी एका हल्ल्याद्वारे, दहशतवाद्यांनी हे स्पष्ट केले आहे की, ते काश्मीर खोऱ्यातील सर्व काश्मिरी पंडितांना ठार मारतील.
संजय टिक्कू यांनी गेल्या वर्षी सांगितले होते की, बडगाम, अनंतनाग आणि पुलवामा यांसारख्या भागातून जवळपास ५०० किंवा त्याहून अधिक लोकांनी बाहेर पडायला सुरुवात केली आहे. काही बिगर काश्मिरी पंडित कुटुंबेही निघून गेली आहेत.
काश्मिरी पंडितांमध्ये वाढला रोष!
- शोपियान जिल्ह्यातील छोटीपुरा भागामध्ये सफरचंदाच्या बागेत काम करणाऱ्या या दोन काश्मिरी पंडित भावांवर गोळ्या झाडण्यात आल्या.
- या गोळीबारामध्ये एकजण मरण पावला तर अन्य एकजण जखमी झाला आहे.
- जखमी भावाला तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असले तरी त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे.
- या घटनेनंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
- या घटनेनंतर काश्मिरी पंडित संघर्ष समिती (केपीएसएस) आक्रमक झाली असून हे वाढते हल्ले लक्षात घेता समाजबांधवांनी काश्मीर खोरे सोडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- काश्मीर खोऱ्यातील सगळ्याच पंडितांना जीवे मारण्याचा दहशतवाद्यांचा विचार आहे, असे ‘केपीएसएस’चे प्रमुख संजय टिक्कू यांनी सांगितले.
- काश्मिरी पंडितांनी आता खोरे सोडून जम्मू किंवा दिल्लीसारख्या सुरक्षित ठिकाणांवर आश्रय घ्यावा असेही त्यांनी नमूद केले.
- मागील ३२ वर्षांपासून आम्ही ही परिस्थिती पाहतो आहोत.
- सरकारला काश्मिरी पंडित अल्पसंख्याक समुदायाला संरक्षण देण्यामध्ये अपयश आले असून आम्ही आणखी किती काळ अशा पद्धतीने मरायचे? हे खूप झाले, असा रोषही त्यांनी व्यक्त केला.