मुक्तपीठ टीम
शेतकरी, संपूर्ण जगाचा अन्नदाता. ग्रामीण भागातून लोक प्रगतीच्या दिशेने वळून शहरात स्थायिक झाले. आजच्या काळात शहरात राहणाऱ्यांना गावची ओढ राहिलेली नाही. सर्वांना करिअर करायचे आहे पण, शेती कोणाला नको. परंतु, कृषी क्षेत्रातही एक उत्तम करिअर घडवता येते. कृषी क्षेत्र अर्थात ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये विविध व्यवसाय करता येतात.
कृषी व्यवसाय हे शेतीवर आधारित एक विस्तृत क्षेत्र आहे, ज्यामध्ये अन्नधान्याचे उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विपणन, व्यवस्थापन, वित्त इत्यादींचा समावेश होतो आणि यामध्ये कृषी-व्यवसाय व्यवस्थापनातील व्यावसायिक महत्त्वाची भूमिका बजावतात. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि बाजारातील गतिशीलता यामुळे कृषी क्षेत्र मोठ्या बदलासाठी सज्ज आहे. अनेक खासगी आणि सार्वजनिक कंपन्या या क्षेत्रात येत असून कृषी व्यवसायाकडे करिअरच्या दृष्टीने अतिशय चांगले क्षेत्र म्हणून पाहिले जात आहे.
कृषी क्षेत्रातील करिअर संधीविषयी सविस्तर माहिती…
- कृषी-व्यवसाय संशोधन, व्यवस्थापन आणि पॅकेजिंगसह इतर अनेक पर्यायांसह वाढीच्या संधी देते.
- कृषी बाजार आणि खाद्यपदार्थ जसे की, फळे, भाजीपाला यांची साठवणूक, दुग्धव्यवसायाचा विस्तार आणि शेतीमध्ये तंत्र आणि तंत्रज्ञानाचा समावेश यामुळे कृषी व्यवसायात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत.
- कृषी-व्यवसाय पदवी अनेक मार्ग उघडते. शेती, किरकोळ विपणन, अन्न प्रक्रिया, अन्न उत्पादन इत्यादींपैकी कोणताही पर्याय निवडू शकता.
- या क्षेत्रात कृषी-व्यवसाय अन्न व्यवस्थापक, कृषी-व्यवसाय विपणन समन्वयक, कृषी-व्यवसाय कार्यालय सहाय्यक, कृषी विश्लेषक, फार्म व्यवस्थापक, पीक उत्पादक, बाजार विश्लेषक, गुणवत्ता नियंत्रक म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
- नॅशनल बँक ऑफ अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड), फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड आणि कृषी मंत्रालय इत्यादीसारख्या सरकारी क्षेत्रातही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
कृषी-व्यवसाय क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता
- कृषी-व्यवसाय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी विज्ञान शाखेतून बारावीनंतर कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा.
- कृषी विषयात बॅचलर पदवी अभ्यासक्रम केल्यानंतर तुम्ही चांगल्या संस्थेतून कृषी व्यवसायात मास्टर्स, एमबीए, पीजीडी, पीजीडीएम करू शकता आणि या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकता.
- नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ अॅग्रीकल्चरल एक्सटेंशन मॅनेजमेंट हैदराबाद येथे पीजीडीएम करू इच्छिणाऱ्यांनी अर्ज कसा करावा?
- नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ अॅग्रीकल्चरल एक्सटेंशन मॅनेजमेंट हैदराबाद येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंटसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह बॅचलर पदवी यासोबतच CAT-2022 चा वैध स्कोअर असणे आवश्यक आहे.
- इच्छुक उमेदवार संस्थेच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२२ आहे.
- अधिक माहितीसाठी https://www.manage.gov.in/abm-admissions/admissions.asp या वेबसाइटवरून माहिती मिळवू शकतात.