मुक्तपीठ टीम
आजवर राजकीय नेत्यांवर होणारे आरोप आणि प्रत्यारोप नेहमीचेच. त्यात नवे नाही. भाजपाकडून पुराव्यांसह आरोप, ईडी-आयटीचा इशारा आणि मग थेट केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई, असे नवे सत्र सध्या सुरु आहे. आता भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या सततच्या आरोपांच्या फैरींनंतर एक वेगळाच मुद्दा चर्चेत आला आहे. सोमय्यांच्या घणाघाती आरोपांमुळे केवळ राष्ट्रवादीचे चार प्रमुख नेतेच नाही तर त्यांचे जावईही लक्ष्य झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चार नेत्यांच्या चार जावयांच्या मागे भाजपा नेते सोमय्यांचा वक्री ग्रह लागला असल्याची मिश्किली सुरु झाली आहे. त्यामुळे आता उरलेल्या नेत्यांच्या जावयांचेही धाबे दणाणण्याची शक्यता आहे.
सोमय्यांची जावई हिट लिस्ट
सोमय्या यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार बड्या नेत्यांच्या जावयावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत:
नेता जावई
- एकनाथ खडसे गिरीश चौधरी
- नवाब मलिक समीर खान
- अनिल देशमुख गौरव चतुर्वेदी
- हसन मुश्रीफ मतीन हसीन मंगोली
एकनाथ खडसे
- पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणामुळे भाजपातून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे अडचणीत आले आहेत.
- याचप्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे.
- जुलै महिन्यात ईडीने त्यांच्यावर कारवाई करुन कोठडीत पाठवलं.
नवाब मलिक
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती.
- दहा तासांच्या चौकशीनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समीर खान यांना अटक केली होती.
अनिल देशमुख
- या महिन्याच्या सुरुवातीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतल होतं.
हसन मुश्रीफ
- किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन यांच्यावर बेनामी कंपन्यांद्वारे पैसे कमावल्याचा आरोप केला आहे.
- “मतीन हसीन हे ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत.
- या कंपनीत ७१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट लिमिटेडचे, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत.
- म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे.
- म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे.
- ब्रिक्स आणि सरसेनापती कारखान्यात ५० कोटींचे व्यवहार झालेत.
- हे व्यवहार अपारदर्शी आहेत.
- हे लिलाव कोणत्या पद्धतीने झाले, किती लिलावात सहभागी झाले हे सर्व अपारदर्शी आहेत, असं सोमय्या म्हणाले.