मुक्तपीठ टीम
कर्नाटकातील ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री केएस ईश्वरप्पा यांच्यावर ४० टक्के कमिशनचा आरोप करत कंत्राटदार संतोष पाटील यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण तापू लागले आहे. त्या आत्महत्येमुळे भाजपा सरकारच्या अडचणी वाढत आहेत. केएस ईश्वरप्पा यांनी कंत्राटदार संतोष पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उडुपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वरप्पा यांचे नाव या प्रकरणी प्रथम आरोपी म्हणून नोंदण्यात आले आहे. कंत्राटदार संतोष पाटील यांचा भाऊ प्रशांत पाटील यांनी मंत्री आणि त्यांचे सहकारी रमेश आणि बसवराज यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता.
‘राजीनामा देणार नाही’
ईश्वरप्पा म्हणाले, सुसाईड नोट हा खोटा प्रचार आहे. मी मुख्यमंत्री बोम्मई आणि पक्षाध्यक्षांना कळवले आहे की, मी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तत्पूर्वी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्याशी वैयक्तिक बोलून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले.
केएस ईश्वरप्पा यांच्यावर कारवाईची मागणी
- मंत्री केएस ईश्वरप्पा यांच्यावर कारवाईची मागणीसाठी विरोधकांनी जोर धरला आहे.
- काँग्रेसने ईश्वरप्पा यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे, तर आम आदमी पक्षाने मंगळवारी सरकारविरोधात निदर्शने केली.
- काँग्रेसने ईश्वरप्पा यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली.
- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बसवराज यांच्यावर निशाणा साधला होता.
मुख्यमंत्री बोम्मईंचे निष्पक्ष चौकशीचे आश्वासन
- कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
- मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांनी पोलिसांना या प्रकरणाचा जलद आणि निःपक्षपातीपणे तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
- पोलिसांना प्रामाणिक आणि पारदर्शक तपासासाठी पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
- सत्य बाहेर येऊ द्या, असे बोम्मई म्हणाले.
- फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने पद्धतशीर, जलद, प्रामाणिक आणि पारदर्शक तपास करण्याचे निर्देश मी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे बोम्मई म्हणाले.