मुक्तपीठ टीम
तारखांवर तारखा, तारखांवर तारखा अशा शब्दात केवळ ‘घायाळ’ सनी देओल फिल्मी पडद्यावरच नाही, तर सर्वसामान्यही प्रत्यक्ष जीवनात घायाळ होत असतात. एकीकडे खुपणारी न्याय दिरंगाई तर दुसरीकडे न्यायाधीशांकडून न्यायासाठी केले जाणारे चाकोरीबाहेरचे प्रयत्न! कौतुक वाटावे असेच. छत्तीसगडच्या कोरबा येथील जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एका प्रकरणात योग्य न्यायदानासाठी अतिशय कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. एका दिव्यांग व्यक्तीचा त्रास ओळखुन सत्र न्यायाधिश बी. पी. वर्मा यांनी न्याय देण्यासाठी न्यायालयाच्या पार्किंगमध्ये धाव घेतली.
न्यायाधीशांची न्यायासाठी धाव
- फिर्यादी व्यक्तीचे वय ४२ वर्ष आहे.
- २०१८ मध्ये झालेल्या एका अपघातात या व्यक्तीला अनेक जखमा झाल्या.
- त्यामुळे त्यांना पक्षाघाताने ग्रासले.
- भरपाईच्या अपेक्षेने ते न्यायालयाबाहेर आले होते.
- शारीरिक स्थितीमुळे त्यांना न्यायालयात आत जाता येत नव्हते.
- हे समजल्यावर न्यायाधीशांनी न्यायालयाच्या बाहेर येऊन २० लाख रुपयांची नुकसान भरपाई त्या व्यक्तीला दिली.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. पी. वर्मा यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरु होती. राष्ट्रीय लोकअदालतीचे कामकाज सुरु असताना पीडित व्यक्तीची अपघात नुकसानभरपाई प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. जेव्हा त्यांना फिर्यादीच्या वैद्यकीय स्थितीची माहिती मिळाली. तेव्हा ते न्यायालय कक्षातून बाहेर आले आणि न्यायालयाच्या आवारातील पार्किंग भागात गेले, जिथे ते फिर्यादी वाहनात थांबले होते.
पिडीत व्यक्तीचे वकील पी एस राजपूत आणि प्रतिवादी विमा कंपनीचे वकील रामनारायण राठोड न्यायाधीशांसोबत पार्किंगमध्ये गेले, जिथे त्यांनी हा निकाल दिला. न्यायाधीशांनी विमा कंपनीला पीडित व्यक्तीला २० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.
नेमकी काय घटना?
- डिसेंबर २०१८ मध्ये कोरबा जिल्ह्यातील रायगड शहरातील माणिकपूर भागात एका कारची ट्रेलरला धडक बसल्याने ही व्यक्ती अत्यंत जखमी झाली होती. अपघातात त्यांचा पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला.
- त्यानंतर त्याला अर्धांगवायूही झाला.
- यामुळे ते अंथरुणावरच होते.
- त्यांच्या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगून पिडीत व्यक्तीने विमा कंपनीकडे भरपाई मागितली.
- तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्यावरील निर्णयानंतर पीडित व्यक्तीने न्यायालयाचे आभार मानले.