मुक्तपीठ टीम
भारत-पाकिस्तान हद्दीजवळ नौकेतून मासेमारी करीत असताना पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीकडून झालेल्या गोळीबारात श्रीधर चामरे या खलाशाचा मृत्यू झाला. दरम्यान हे प्रकरण ताजं असताना पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या तलासरी तालुक्यातील वरवाडा, गुंदनपाडा येथील राजेश बाबू वळवी खलाशी व त्यांच्या कुटुंबांचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. राजेश वळवी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देत जिजाऊ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिला आहे.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
- तलासरीतील १५ हून अधिक कुटुंबांतील खलाशी पाकिस्तानच्या कैदेत आहेत.
- शासनस्तरावर त्यांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू असून सध्या त्यांचे कुटुंबीय बिकट अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले.
- राजेश वळवी हे बोटीतून मच्छीमारीसाठी पाकिस्तानच्या हद्दीत गेले असता, त्यांना तिथे पकडण्यात आले होते.
जिजाऊकडून आर्थिक मदत
- त्यांच्या घरी वृद्ध वडील, पत्नी व दोन लहान मुले आहेत.
- राजेश हे वर्षभरापासून पाकिस्तानमध्ये अडकलेले आहेत.
- त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे जिजाऊ संस्थेला कळताच त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत करण्यात आली.
- वह्या, पुस्तके व किराणा सामान देण्यात आले.
- यावेळी जिजाऊ जिल्हाध्यक्ष, जावेद खान, विराज सुतार, अजय उंबरसाडा, पंकज वसावे, विक्रम शेलार व वरवाडा गुंदनपाडा ग्रामस्थ उपस्थित होते.