मुक्तपीठ टीम
ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी या तीर्थक्षेत्राजवळील पेंढारीपाडा येथे राहणाऱ्या वृद्ध दांपत्याची अमानुष हत्या झाली आहे. मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करून त्यांचे जीवन संपवले आहे. मारेकऱ्यांनी वृद्धेच्या शरीरावरील दागिन्यांना हातही लावलेला नसल्याने वेगळा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परिसरात या दुहेरी हत्येमुळे दहशत पसरली असून पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरित तपास करून मारेकऱ्यांना जेरबंद करून अद्दल घडवावी, अशी मागणी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या ठाणे जिल्हाप्रमुख मोनिका पानवे यांनी केली आहे.
दुहेरी हत्येने वज्रेश्वरी परिसरात दहशत
- भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी जवळील अंबाडी रस्त्यावर असणाऱ्या पांढरीपाडा येथे ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
- तेथे राहणाऱ्या वृद्ध पती-पत्नीची धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.
- जगन्नाथ (बाळू) पाटील (वय ८३), सत्यभामा पाटील (वय ७५) अशी हत्या झालेल्या वृद्ध पती पत्नीची नावे आहेत.
- ते वज्रेश्वरी जवळ अंबाडी रस्त्यालगत आपल्या घरात राहत होते.
- प्रथमदर्शनी सदर हत्या कोणत्या उद्देशाने झाली आहे हे स्पष्ट झालेले नाही.
- वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने तसेच होते, अशी माहिती पोलिसांनी दिली असल्याने उद्देश स्पष्ट होत नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला आहे.
मात्र, या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात दहशत परसल्याची दखल घेत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या ठाणे जिल्हाप्रमुख मोनिका पानवे यांनी पोलिसांना पत्र लिहून मागणी केली आहे. ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना दिलेल्या पत्रात सखोल चौकशी करत मारेकऱ्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी स्थानिक यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यासही त्यांनी सुचवले आहे.