मुक्तपीठ टीम
“अयोध्या तो झांकी है, मथुरा-काशी बाकी है!” अशा घोषणा गाजत असतात. हिंदुत्ववादी राजकारण्यांचा पुढचा अजेंडा त्यातून दिसतो, असं म्हटलं जातं. पण आता त्या अजेंड्यात आणखी एका नावाची भर पडली आहे, ते म्हणजे आग्र्याचा ताजमहाल! उत्तरप्रदेशातील तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंसाचार्य यांनी ताजमहालची वास्तू प्रत्यक्षात तेजो महालय या शिवमंदिराची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परमहंसाचार्य गुरुवारी, ५ मे रोजी ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे जाणार आहेत. आग्रा येथील ताजमहाल (तेजो महालय) येथे भगवान शंकराची प्रतिष्ठापनाही करण्याचा त्यांचा बेत आहे.
ताजमहाल नाही तेजो महालय!
- ताजमहालचे वर्णन तेजो महालय असे करताना परमहंसाचार्य म्हणाले की, इतिहासाशी छेडछाड करण्यात आली आहे.
- शिवमंदिर तेजो महालयाचे नामकरण ताजमहाल असे करण्यात आले.
- भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी आग्रा येथे सनातन धर्म संसदही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- त्यांनी देशातील सर्व हिंदू संघटनांना आवाहन केले आहे की, ५ मे रोजी जास्तीत जास्त लोकांनी ताजमहालच्या पश्चिमेकडील दरवाजावर एकत्र जमावे.
प्रवेश नाकारला, मग माफी मागितली!
याआधी परमहंस आचार्य ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे गेले होते, तेथे परमहंस आचार्य यांनी ताजमहालच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांवर असभ्यतेचा आरोप केला होता. त्यांनी आरोप केला होता की, त्यांना भगव्या कपड्यांमुळे प्रवेश दिला गेला नाही. जगद्गुरू परमहंस आचार्य यांच्या आरोपानंतर आग्रा येथे अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनही केले होते. पुरातत्व विभागाचे प्रमुख आर के राय यांनी सोशल मीडियावर त्यांची माफी मागितली आणि आग्रा येथील ताजमहालला भेट देण्याचे निमंत्रणही दिले.