मुक्तपीठ टीम
मुंबईतील अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबईतील पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृहमंत्रालयानं पाठवला होता. त्या फाइलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सही केल्यानंतर निलंबनाचा मार्ग मोकळा झाला. आता त्यांचा जामीन न्यायालयानं फेटाळला तर ते गजाआडही जावू शकतील.
उपायुक्त पदावरील सौरभ त्रिपाठी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अंगडियांच्या व्यवसायाची माहिती मिळाली. अंगडिया हे जुन्या काळातील कुरियर सर्व्हिस मानले जातात. पण ते वस्तूंबरोबरच हिरे, रोख रकमेचीही ने-आण करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची भीती दाखवत त्रिपाठींनी वसुलीचा नवा मार्ग शोधला.
आयपीएस सौरभ त्रिपाठींवर माफियांसारखा वसुलीचा आरोप!
- अंगडिया असोसिएशनने गेल्या वर्षी ७ डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली.
- त्यांनी आरोप केला होता की, मुंबईतील परिमंडळ दोनचे उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी अंगडियांना त्यांचा व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी १० लाख रुपये मागितले होते.
- दर महिन्याला दहा लाख मिळाले तरच कारवाई करणार नाही, असे धमकावले होते.
- त्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हाही नोंदवला.
- या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने क्राइम ब्रँचने ३ पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
- जे एलटी मार्ग पोलिसांमध्ये तैनात होते.
- लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात पीआय ओम वनगटे, एपीआय नितीन कदम आणि पीएसआय समाधान जमदाडे यांना अटक केली आहे.
- या प्रकरणी १६ मार्च रोजी गुन्हे शाखेने सौरभ त्रिपाठींना पोहिजे आरोपी घोषित केले होते.
त्रिपाठींविरोधात ऑडियो क्लिप्सचेही पुरावे!
- त्रिपाठी हा या प्रकरणात आरोपी असल्याचे सांगितले जाते.
- मुंबई पोलिसांनी गृह मंत्रालयाला या वसुली प्रकरणाची माहिती दिली.
- यासोबतच त्रिपाठी यांच्याविरोधातील पुराव्यांचीही माहिती देण्यात आली.
- त्रिपाठी यांनी तक्रारदाराला फोन करून तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचाही आरोप असल्याची माहिती दिली.
- या आरोपाचे समर्थन करण्यासाठी काही ऑडिओ क्लिपही मुंबई पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
पोलीस उपायुक्तांची गुन्हेगारासारखी जामीनासाठी धडपड!
- उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर वसुलीचा आरोप झाल्यामुळे अटकेची टांगती तलवार आहे.
- आता अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
- सूत्रांनी सांगितले की त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामीन याचिकेत म्हटले आहे की एफआयआरमध्ये त्यांचे नाव यापूर्वी नमूद केलेले नव्हते.
- तसेच पोलीस ठाण्याच्या पातळीवर अंगडियांकडून पैसे वसूल केले जात असल्याची त्यांना माहिती नव्हती.
- बुधवारी, २३ मार्च रोजी जामीन अर्जावर सुनावणी आहे.
- जामीन फेटाळला गेला तर त्यांना अटकेची शक्यता आहे.