मुक्तपीठ टीम
ऑक्टोबर २६ रोजी बेपत्ता झालेल्या ‘नावेद – २’ या मासेमारी बोटीचे अवशेष रत्नागिरी किना-याजवळील अरबी समुद्रात सापडले आहेत. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी ही नौका खोल समुद्रात गायब झाली होती. अखेर नौकेचा शोध घेण्याची कामगिरी नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली आणि त्यांनी सुरु केलेली शोध मोहिम फत्ते झाली. ही नौका मुंबईला वेळीच न परतल्यामुळे ‘नावेद’चा जंग जंग शोध सुरु होता. महाराष्ट्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय आणि संबधित विभागांकडूनही नौकेचा २६ आॅक्टोबरपासूनच शोध घेण्यात येत होता. राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणाही नौकेचा शोध घेण्यात अपयशी ठरले होते. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीच्या आधारे, भारतीय नौदलाने रत्नागिरी किना-याजवळील अरबी समुद्रात बेपत्ता झालेली ‘नावेद २ ’ ही शोधण्यासाठी १८ डिसेंबर २१ रोजी ‘आयएनएस मकर ’ ही जलविज्ञान सर्वेक्षण नौका तैनात केली. २६ ऑक्टोबर २१ रोजी बेपत्ता झालेली ही अन्य मासेमारी किंवा अन्य मालवाहू नौकांच्या दिशादर्शनाकरीता (नॅव्हिगेशन) धोकादायक ठरू शकते, अशी धास्ती राज्य सरकार आणि नौदलालाही होती. महाराष्ट्र सरकारने भारतीय नौदलालाही नौकेच्या चालक दलातील बेपत्ता सदस्याची माहिती दिली होती. ‘मकर’ रत्नागिरीजवळ तैनात केल्यावर नौदलाच्या संबंधित अधिकारी आणि नौसैनिकांनी त्यांच्या नौकेवर असलेल्या ‘विशेष सोनार’ उपकरणांद्वारे, समुद्रतळातून नौकेचा अवशेष शोधून काढला. दुर्घटनाग्रस्त नौकेचा अर्धा भाग चिखलात बुडाला होता. ‘नावेद २ ’ची दुर्घटना पाहता, नौदल अधिका-यांनी त्यावरील सुरक्षित खोलीचा शोध घेतला. जयगडच्या सागरी पोलिसांसमवेत नौदलाकडूनही समन्वित ‘डायव्हिंग’ घेण्यात आले आणि बेपत्ता झालेल्या ‘क्रू मेंबर’चे पार्थिवही ‘मकर’ने बाहेर काढले.