मुक्तपीठ टीम
भारतातील पहिली स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन कंपनी ‘बाऊन्स’ने गुरुवारी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. डिलिव्हरीची कोणतीही विशिष्ट तारीख दिली नसली तरी, लॉन्च झाल्यानंतर काही आठवड्यांतच कंपनी ‘बाऊन्स’ इन्फिनिटी स्कूटरची डिलिव्हरी सुरू करणार आहे. लॉन्च झाल्यानंतर ‘बाऊन्स’ने या स्कूटरची बुकिंगही सुरू केली आहे. ही स्कूटर बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त ४९९ रुपये बुकिंग रक्कम भरावी लागेल.
‘बाऊन्स इन्फिनिटी’ मध्ये उत्तम आणि काढता येणारी ली-आयन बॅटरी आहे. ग्राहक त्यांच्या सोय आणि गरजेप्रमाणे गाडीतून बॅटरी काढून घेऊन चार्जिंग करू शकतात. या जोडीला, ’बाऊन्स’ तर्फे वैशिष्ट्यपूर्ण ‘बॅटरी अॅज अ सर्व्हिस’ हा पर्यायही देण्यात येत आहे. भारतीय बाजारपेठेत हे प्रथमच होत आहे. यामध्ये ग्राहकांना एकदम वाजवी किंमतीत बॅटरी शिवाय ‘बाऊन्स इन्फिनिटी’ खरेदी करण्याचा आणि ‘बाऊन्स’ बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क त्याऐवजी वापरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
ग्राहकांनी बॅटरी स्वॅप्स साठी पैसे भरले की ‘बाऊन्स’ स्वॅपिंग नेटवर्क मधून रिकाम्या बॅटरीच्या बदल्यात संपूर्णपणे चार्ज झालेली बॅटरी ते घेऊ शकणार. यामुळे पारंपरिक स्कूटर्स च्या तुलनेत या स्कूटरची प्रवाही किंमत ४०% पर्यंत खाली उतरते.
इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किंमतीत ४० ते ५०% पर्यतची किंमत ही बॅटरीचीच असते. बॅटरीची किंमत वजा जाता इलेक्ट्रिक स्कूटर्सची किंमत ग्राहकांच्या खिशाला परवडणारी आहे. यामुळे भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या मागणीला चालना मिळेल. या जोडीलाच, ’बाऊन्स’ वेगाने व्यापक पातळीवर बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क उभारत आहे. त्यामुळे किरकोळ ग्राहक आणि त्यांच्या यशस्वी राईड शेअरिंग व्यवसायालाही मदत होईल.
‘बाऊन्स’ ने २०२१ मध्ये २२मोटर्समध्ये १०० टक्के वाटा मिळविला असून या कराराचे मूल्य ७ दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे. २२मोटर्सशी झालेल्या कराराचा भाग म्हणून ‘बाऊन्स’ ने त्यांची बौद्धिक संपदा आणि राजस्थानमधील भिवडी येथील उत्पादन केंद्र यांच्यावर ताबा मिळविला आहे. या अत्याधुनिक केंद्राची दरवर्षी १८०,००० स्कूटर्स उत्पादन करण्याची क्षमता आहे. भारतीय बाजारपेठेची क्षमता लक्षात घेऊन, कंपनी दक्षिण भारतात आणखी एक उत्पादन केंद्र उभारण्याची योजना आखत आहे. पुढील एका वर्षात इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात १०० दशलक्ष अमेरिकी डॉलर गुंतविण्यासाठी ‘बाऊन्स’ ने बाजूला ठेवले आहेत.