मुक्तपीठ टीम
मुंबई शहरात कार्यरत असलेल्या नवजात बालकांच्या खरेदी-विक्री करणार्या टोळीचा गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या युनिट एकच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या परिसरातून सात महिलांसह दोन पुरुष अशा नऊजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यात एका डॉक्टरसह महिला टेक्नीशियन आणि महिला दलालांचा समावेश आहे. गितांजली सचिन गायकवाड, रुक्सार मोहम्मद शकील शेख, शहाजहान शौकत जोगीलकर, रुपाली शंकर वर्मा, संजय शांताराम पंडम, गुलशन खान, निशा अहिरे, आरती हिरामणी सिंग, डॉ. धनजंय मोगा अशी या नऊजणांची नावे आहेत. या टोळीने आतापर्यंत मुंबईसह पुण्यात काही नवजात बालकांची साठ हजार आणि तीन लाख रुपयांमध्ये विक्री केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.
अटकेनंतर या सर्व नऊ आरोपींना स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वांद्रे येथील संत ज्ञानेश्वर नगर, सम्राट चाळीत रुक्सार शेख नावाची एक महिला राहते, तिने अलीकडेच सांताक्रुज येथील व्ही एन देसाई रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला होता, या मुलाची नंतर तिने विक्री केली आहे. अशाच प्रकारे तिने यापूर्वी एका मुलीला जन्म दिला होता, या मुलीचीही तिने विक्री केली होती, इतकेच नव्हे तर याच परिसरात राहणार्या शहाजहान जोगीलकर या महिलेने दिड वर्षांपूर्वी एका मुलाला जन्म दिला होता, तिनेही रुक्सारप्रमाणे तिच्या मुलाची विक्री केली होती.
ही माहिती वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्यांनी त्याची गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती शहानिशा करुन संबंधित आरोपीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश युनिट एकला दिले होते. या आदेशानंतर सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शशांक सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत शिंदे, जयेश ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक जगताप, मुठे, सुनिल तावडे, महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा पवार, सहाय्यक फौजदार तानाजी मोरे, आप्पा हुनगीनाळे, अशोक मोहिते, पोलीस हवालदार श्रीधर भोईटे, संतोष शेलार, जितेंद्र शेडगे, पोलीस नाईक सुनिल सोहनी, प्रकाश माने, सुनिल मैड, नाना गोडे, रमेश मदने, शैलेश शिंदे, संदीप सुपे, नितीन तायडे, नितीन तुपे, विनोद भादले, गोरक्षनाथ घुगे, संतोष लोखंडे, पोलीस शिपाई नागेश तोरणे, अमोल वैर्हाडी, महिला पोलीस हवालदार साठे, डोईफोडे, डुंबरे, चव्हाण यांनी तपासाला सुरुवात केली होती.
मुंबईसह पुण्यात बालकांची विक्री
या पथकाने व्ही. एन देसाई रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता १ डिसेंबर २०२० रोजी रुक्सार शेख हिची प्रसुती झाली होती, तिने एका मुलाला जन्म दिला होता. या माहितीनंतर पोलिसांनी संत ज्ञानेश्वर नगरात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रुक्सार ही तिच्या आईसोबत राहत असून तिने तिच्या मुलाची विक्री केल्याची कबुली दिली. तिच्यासोबत शहाजहान हिनेदेखील तिचा मुलगा धारावी येथे राहणार्या संजय शांताराम पंडम याला विकल्याचे सांगितले. शहाजहानच्या चौकशी तिने या वृत्ताला दुजोरा देताना तिचे मुल तिने साठ हजार रुपयांना विकल्याचे सांगितले. याकामी रुक्सार आणि शहाजहान हिला रुपाली वर्मा, गुलशन खान, निशा अहिरे आणि इतरांनी मदत केली होती. नवजात बालकांची विक्री करणारी एक टोळी असून या टोळीत ते सर्वजण एजंट म्हणून काम करीत होते. या टोळीने मुंबईसह पुणे शहरात या नवजात बालकांची विक्री केल्याचे तपासात सांगितले. हा प्रकार उघडकीस येताच गुन्हे शाखेकडून खेरवाडी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली होती, या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध ३७० (४), ३४ भादवी सहकलम ८१ ज्युवेनाईल जस्टीम कलमार्ंतत गुन्हा नोंदविला होता, या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे स्वतकडे घेतला होता.
लॅब टेक्निशियनचीही टोळीला मदत
या चौकशीनंतर १४ जानेवारीला रुक्सार, शहाजहान, रुपाली वर्मा, संजय पंडमसह चौघांना, दुसर्या दिवशी निशा अहिरे, गुलशन खान अशा सहाजणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना न्यायालयाने २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. याच गुन्ह्यांत गितांजली गायकवाड आणि आरती सिंग हिचा सहभाग उघडकीस आला होता, आरती ही सांताक्रुज येथे राहत असून एका पॅथोलॉजी लॅबमध्ये टेक्शीनियन म्हणून काम करते. तिची गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी केली असता तिचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता, त्यामुळे तिला पोलिसांनी अटक केली.