मुक्तपीठ टीम
इंडोनेशियात एका फुटबॉल सामन्यात एक भयानक दृश्य पाहायला मिळाले आहे. सामन्यादरम्यान दोन फुटबॉल संघांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली, त्यानंतर याने हिंसाचाराचे रूप धारण केले. मिळालेल्या माहितीनुसार, फुटबॉल सामन्यातील हिंसाचार आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १२९ लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर सामना आठवडाभरासाठी स्थगित करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
- हिंसाचारात सुमारे १२९ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
- ही घटना पूर्व जावाच्या मलंग रिजन्सी येथील कंजुरुहान स्टेडियमची आहे. येथे अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यात फुटबॉल सामना खेळला जात होता.
- ज्यात अरेमाचा संघ हरला. त्यांचा संघ हरत असल्याचे पाहून अरेमाचे चाहते मोठ्या संख्येने मैदानाकडे धावू लागले.
- यादरम्यान स्टेडियममध्ये उसळलेल्या हिंसाचारात ३५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ९२ जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दोन पोलिसांचा मृत्यू, खेळाडूंवरही हल्ला…
- हल्ला, चेंगराचेंगरी आणि गुदमरल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे.
- त्याचवेळी स्टेडियममध्ये मारल्या गेलेल्यांमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
- याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये लोकांनी आत घुसून सुरक्षा जवानांवर वस्तू फेकण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.
- काही लोकांनी खेळाडूंवरही हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि लोकांना नियंत्रित करण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या.
- ज्यामुळे किमान १२७ लोकांचा मृत्यू झाला तर १८० जण जखमी झाले. दंगलीनंतर लीगने खेळ सात दिवसांसाठी स्थगित केले आहेत.
इंडोनेशियाच्या फुटबॉल संघटनेने आपले मत व्यक्त केले, माफी मागितली
इंडोनेशियाच्या फुटबॉल असोसिएशनने एक निवेदन जारी करून या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आणि सांगितले की खेळानंतर काय घडले याची चौकशी करण्यासाठी एक संघ मलंगला रवाना झाला आहे. “पीएसएसआय कंजुरुहान स्टेडियमवर अरेमा समर्थकांच्या कृत्याबद्दल खेद व्यक्त करतो,” असे निवेदनात म्हटले आहे. आम्ही दिलगीर आहोत आणि पीडितांच्या कुटुंबियांची आणि घटनेत सहभागी असलेल्या सर्व पक्षांची माफी मागतो. यासाठी पीएसएसआयने तातडीने तपास पथक तयार केले आणि ते तात्काळ मलंगकडे रवाना झाले.
BRI Liga 1 लीगचे सर्व सामने आठवडाभरासाठी स्थगित
- या हिंसाचार आणि चेंगराचेंगरीनंतर फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडोनेशिया म्हणजेच पीएसएसआयने BRI Liga 1 लीगचे सर्व सामने एका आठवड्यासाठी स्थगित केले आहेत.
- यासोबतच अरेमा फुटबॉल क्लबच्या संघाला या हंगामातील उर्वरित सामने आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.