मुक्तपीठ टीम
विक्रांत या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेच्या सागरी चाचण्यांचा चौथा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. हवाई वाहतूक सुविधा समन्वित उपकरणांसह बहुतांश उपकरणे आणि प्रणालींच्या एकात्मिक चाचण्या घेण्यात आल्या. या महिन्याच्या अखेरपर्यंत पर्यंत युद्धनौका नौदलाकडे सुपूर्द करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. आणि त्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑगस्टमध्ये ही युद्धनौका नौदलाच्या सेवेत औपचारिकरीत्या दाखल होणार आहे.
भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेडने ७६% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री वापरत केलेली या विमानवाहू जहाजाची स्वदेशी रचना आणि बांधणी हे ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया उपक्रम’ साठी देशातील संशोधनाचे एक चमकदार उदाहरण आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात पूरक उद्योगांच्या विकासाबरोबरच,२ हजारहून अधिक कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या कर्मचार्यांना आणि पूरक उद्योगांमध्ये सुमारे १२ हजार कर्मचार्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊन रचना आणि बांधणी क्षमतांमध्ये वाढ झाली आहे.
स्वदेशी विमानवाहू युद्धनौका विक्रांतच्या पहिल्या टप्प्यातील सागरी चाचण्या २१ ऑगस्ट मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. त्यानंतर सागरी चाचण्यांचा दुसरा आणि तिसरा टप्पा अनुक्रमे २१ ऑक्टोबर आणि २२ जानेवारीला पूर्ण झाला. सागरी चाचण्यांच्या या तीन टप्प्यांदरम्यान, परिचालन यंत्रसामग्री, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सूट्स, डेक मशिनरी, जीवरक्षक उपकरणे, जहाजाची दिशादर्शक आणि दळणवळण प्रणालीची क्षमता चाचणी घेण्यात आली.