मुक्तपीठ टीम
भारतीय हवाई दलात आज स्वदेशी बनावटीचे ‘लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर’ दाखल झाले आहे. त्यामुळे आता भारताची हवाई ताकद आणखी वाढली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या उपस्थितीत जोधपूरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राजनाथ सिंह यांनी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर ‘प्रचंड’मधून जोधपूर एअरबेसवर उड्डाण केले. हे हेलिकॉप्टर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यास आणि इतर शस्त्रे वापरण्यास सक्षम आहे.
यापूर्वी स्वदेशी बनावटीचे आणि विकसित केलेले लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर २९ सप्टेंबर रोजी भारतीय लष्करात सामील करण्यात आले होते. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या महासंचालकांनी पहिले एलसीएच औपचारिकपणे आर्मी एव्हिएशन कॉर्प्सकडे सुपूर्द केले. या मार्चमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने स्वदेशी विकसित मर्यादित मालिका उत्पादन लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरच्या खरेदीला मंजुरी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ३ हजार ८८७ कोटींच्या खरेदीला मंजुरी
- या वर्षी मार्चमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने ३ हजार ८८७ कोटी रुपयांना १५ स्वदेशी विकसित लाइट कॉम्बॅट हॅलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजुरी दिली.
- यातील १० हेलिकॉप्टर हवाई दलासाठी तर पाच हेलिकॉप्टर लष्करासाठी असतील.
- अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाइट कॉम्बॅट हॅलिकॉप्टर ‘अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर’ ध्रुव प्रमाणेच आहे.
लाइट कॉम्बॅट हॅलिकॉप्टरचे जबरदस्त फिचर्स
- हे हेलिकॉप्टर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केले आहे. यामध्ये अनेक प्रकारची क्षेपणास्त्रे आणि शस्त्रे बसवता येतात.
- त्यात अनगाइड बॉम्ब आणि ग्रेनेड लाँचर्स बसवता येतात.
- लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर एका वेळी ३ तास १० मिनिटे सतत उड्डाण करू शकते. ते जास्तीत जास्त ६५०० फूट उंचीपर्यंत जाऊ शकते.
- ते कमाल २६८ किमी प्रतितास वेगाने उड्डाण करू शकते. त्याची रेंज ५५० किलोमीटर आहे. या हेलिकॉप्टरची लांबी ५१.५० फूट आणि उंची १५.५ फूट आहे.
- दोन इंजिन असलेल्या या हेलिकॉप्टरद्वारे अनेक शस्त्रांच्या वापराची चाचणी यापूर्वीच घेण्यात आली आहे.
- यात रडार इव्हॉशन फिचर, आर्मड प्रोटेक्शन सिस्टीम, नाईट अटॅक आणि इमर्जन्सी लँडिंग क्षमता आहे.
- हे हेलिकॉप्टर हवेतून पृष्ठभागावर आणि हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम आहेत.
- हेलिकॉप्टर उच्च-उंचीवरील बंकर-बस्टिंग ऑपरेशन्स, जंगल आणि शहरी वातावरणात बंडखोरीविरोधी ऑपरेशन्स तसेच भारतीय सैन्याला मदत करण्यासाठी तैनात केले जाऊ शकते.
- या हेलिकॉप्टरमध्ये दोन लोक बसू शकतील अशी क्षमता आहे.