मुक्तपीठ टीम
कॉमनवेल्थ गेम्समध्ये बॉक्सिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीन आणि लोव्हलिना बोरगोहेन यांची निवड करण्यात आली आहे. याआधी निखत झरीनने भारताला विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावून दिले आहे. दरम्यान झरीन सध्या वेगळ्या गोष्टींमुळेही चर्चेत आहे. झरीनला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की, लोकं तिची मेहनत आणि रिंगमधील कामगिरीपेक्षा तिच्या धार्मिक पार्श्वभूमीबद्दल अधिक बोलतात, तेव्हा तिने सांगितले की, ” ‘हिंदू-मुस्लिम’चा मला काही फरक पडत नाही. एक खेळाडू म्हणून मी भारताचे प्रतिनिधित्व करते.
खेळाडू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करते…
- पुराणमतवादी समाजातून आलेल्या झरीनला बॉक्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी सामाजिक पूर्वग्रहांना सामोरे जावे लागले.
- पण या २५ वर्षीय खेळाडूने स्पष्ट केले की ती कोणत्याही विशिष्ट समुदायासाठी नाही तर भारतासाठी खेळते आणि जिंकते.
- तिने सांगितले की, “हिंदू-मुस्लिम आणि अन्य कोणत्याही गोष्टींचा मला काही फरक पडत नाही.
- एक खेळाडू म्हणून मी भारताचे प्रतिनिधित्व करते.
- मला ‘हिंदू-मुस्लिम’ या वादात पडायचे नाही आणि मला त्या गोष्टींचा काही फरक पडत नाही.
- मी कोणत्याही समुदायाचे प्रतिनिधित्व करत नाही, मी देशाचे प्रतिनिधित्व करते आणि देशासाठी पदक जिंकून मला आनंद होतो.”
खेळाडूंना मानसिक दबाव हाताळण्यासाठी प्रशिक्षित करणे आवश्यक!
- इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्स (IWPC) ने आयोजित केलेल्या संभाषणात जेव्हा निखतला विचारण्यात आले की भारतीय बॉक्सर्सची कुठे कमतरता आहे, तेव्हा तिने सांगितले की, भारतीय बॉक्सर्स खूप प्रतिभावान आहेत, आम्ही कोणापेक्षा कमी नाही.
- आमच्याकडे ताकद, वेग आणि आवश्यक कौशल्ये सर्व काही आहे.
- तुम्ही एकदा जागतिक स्तरावर पोहोचलात की खेळाडूंना मानसिक दबाव हाताळण्यासाठी प्रशिक्षित करणे आवश्यक आहे.
झरीन राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार!
- तिने पुढे सांगितले की, मोठ्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर अनेक खेळाडू दडपणाखाली येतात आणि त्यांना चांगली कामगिरी करता येत नाही.
- गेल्या महिन्यात ‘फ्लायवेट’ स्पर्धेत जगज्जेते ठरलेल्या झरीन २८ जुलैपासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.