मुक्तपीठ टीम
गुजरातमध्ये पार पडलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये सेनादलाने ६१ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३२ कांस्य पदके जिंकून पदकतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. सशस्त्र दलांची उत्कृष्ट परंपरा कायम ठेवत, सेनादलाने सेना क्रीडा नियंत्रण मंडळाच्या (एसएससीबी) मार्गदर्शनाखाली स्पर्धेत धैर्य, कौशल्य आणि खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले आणि अभिमानास्पद कामगिरी करत राजा भालिंद्र सिंग चषकावर आपले नाव कोरले. सेनादलाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सलग चौथ्यांदा हा चषक पटकावण्याचा मान मिळवला आहे.
१२ ऑक्टोबर २०२२ रोजी सूरत येथील पंडित दीनदयाल उपाध्याय इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या समारोप समारंभात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सेना क्रीडा नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष एअर मार्शल के. अनथरामन आणि सेना क्रीडा नियंत्रण मंडळाचे सचिव ग्रुप कॅप्टन दिनेश सुरी यांना हा चषक प्रदान केला. एअर मार्शल यांनी एसएससीबीच्या वतीने हा चषक देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सेवादलाच्या सर्व जवानांना समर्पित केला. सचिवांनी या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय सर्व खेळाडूंच्या शिस्त आणि समर्पित वृत्तीला दिले.
एसएससीबी संस्थेची स्थापना १९१९ मध्ये झाली आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या संस्थापक सदस्यांपैकी ही एक संस्था आहे. या वारशामुळेच एसएससीबीला इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे. भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेना या तिन्ही सेवांमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि जागतिक सेनादल स्पर्धेत(World Military Games) सेनादलाचा भाग म्हणून निवड होण्यासाठी आणि मैदानात उतरण्यासाठी आंतर-सेना स्तरावर कठीण निवड प्रक्रियेतून सामोरे जावे लागते.