मुक्तपीठ टीम
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक श्वान गंभीर जखमी झाला. रात्री उशिरा दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील तंगपावा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. या शोध मोहिमेत लष्कराने आपल्या लढाऊ सैनिक झूमलाही खाली आणले होते. झूम हे भारतीय लष्करातील श्वानाचे नाव आहे. दहशतवादी लपलेले घर खाली करण्याचे काम झूमला देण्यात आले होते. झूमने घरात घुसून दहशतवाद्यांवर हल्ला केला. यावेळी ऑपरेशन दरम्यान झूमला दोन वेळा गोळ्या लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला.
अधिकार्यांनी सांगितले की झूम पूर्वीही अनेक सक्रिय मोहिमांचा एक भाग आहे. “झूमने दहशतवाद्यांवर हल्ला केला यादरम्यान त्याला दोन गोळ्या लागल्या.” अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या धाडसी श्वानाला लष्कराच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ते म्हणाले की झूमला दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले, तर दोन जवानही जखमी झाले.”
दोन गोळ्या लागल्यानंतरही ‘झूम’ लढत राहिला… लष्कराने शेअर केला व्हिडीओ!
- लष्कराने आपल्या धाडसी झूमच्या प्रशिक्षणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
- प्रशिक्षणाचा व्हिडीओ पाहून अंदाज लावू शकता की जगातील कोणताही दहशतवादी झूमपासून सुटू शकत नाही.
- लष्कराकडे श्वानांची मोठी फौज आहे.
- भारतीय लष्कर आपल्या सैन्यात वेगवेगळ्या जातीच्या श्वानांची देखभाल करते.
- यामध्ये लॅब्राडॉर, जर्मन शेफर्ड्स, बेल्जियन मालिनॉइस आणि ग्रेट माउंटन स्विस डॉग्स यांचा समावेश आहे.
- यांची वेगवेगळी कर्तव्ये आहेत. यामध्ये गार्ड ड्युटी, गस्त घालणे, स्फोटक द्रव्ये, स्निफिंग ड्रग्ज आणि इतर प्रतिबंधित वस्तू इत्यादींचा समावेश आहे.
या वर्षी ३० जुलै रोजी झूमच्या आधी आर्मी डॉग एक्सलनेही अशाच प्रकारे दहशतवाद्यांना लढा दिला होता. शौर्य दाखवून एक्सल शहीद झाला. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त एक्सला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.