मुक्तपीठ टीम
हवाई प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या नव्या आदेशानुसार आता विमानांच्या क्षमतेच्या ८५ टक्के प्रवाशांसह हवाई प्रवासाची परवानगी असेल. पूर्वी ही मर्यादा ७२.५ टक्के होती. नागरी उड्डयन मंत्रालयाचा हा आदेश १८ सप्टेंबरपासून लागू झाला आहे. त्यामुळे आता प्रवाशांची संख्या वाढेलच, पण नव्या नियमांमुळे किमान दरानेही प्रवास करता येणाराय. प्रवाशी संख्या वाढल्याने अधिक जास्त प्रवाशी विमानांकडे वळण्याची शक्यताय.
दर महिन्याला हवाई प्रवाशांमध्ये वाढ
- कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षीपासून उड्डाणांची गती मंदावली होती.
- परंतु, परिस्थिती सुधारल्यानंतर प्रवाशी मे २०२०पासून पुन्हा एकदा हवाई प्रवासाकडे वळले.
- मे २०२० ते मार्च २०२१ पर्यंत दर महिन्याला हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली.
- कोरोना दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा हवाई वाहतुकीला फटका बसला होता. परंतु हळूहळू स्थिती सुधारत आहे.
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ६७ लाख प्रवाशांनी ऑगस्टमध्ये विमान प्रवास केला. तर जुलैमध्ये ही संख्या फक्त ५ लाख एक हजार होती. ही संख्या पाहता सरकारने आता विमानांची प्रवाशी क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या काही उद्योगांमध्ये विमान क्षेत्र देखील आहे. सरकारच्या या निर्णयाचा चांगला परिणाम होईल अशी अपेक्षा आहे.
पंधरा दिवसांपर्यंतचे भाडे ठरवता येणे शक्य असेले
- नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले की, विमान भाड्याच्या किमान आणि कमाल मर्यादा कोणत्याही वेळी १५ दिवसांसाठी लागू राहतील आणि विमान कंपन्या १६ व्या दिवसापासून कोणत्याही मर्यादेशिवाय भाडे आकारतील.
- या वर्षी १२ ऑगस्टपासून लागू झालेली ही व्यवस्था सध्या ३० दिवसांसाठी होती आणि विमान कंपन्या ३१ व्या दिवसापासून कोणत्याही मर्यादेशिवाय भाडे आकारत होत्या.
- शनिवारी जारी केलेल्या नवीन आदेशात मंत्रालयाने म्हटले आहे, समजा आज तारीख २० सप्टेंबर आहे, तर ४ ऑक्टोबरपर्यंत भाडे मर्यादा लागू असेल.
- अशा प्रकारे, ५ ऑक्टोबर रोजी किंवा नंतरच्या प्रवासासाठी २० सप्टेंबर रोजी केलेली बुकिंग भाडे मर्यादेद्वारे नियंत्रित केली जाणार नाही.
- जर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी बुकिंग केले गेले तर भाडे मर्यादा ५ ऑक्टोबरपर्यंत लागू होईल आणि ६ ऑक्टोबर रोजी किंवा नंतरच्या प्रवासासाठी भाडे मर्यादा लागू होणार नाही.
कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊननंतर २५ मे २०२० रोजी फ्लाइट सेवा पुन्हा सुरू झाल्यावर भारताने फ्लाइटच्या कालावधीच्या आधारावर भाड्याची कमी आणि वरची मर्यादा निश्चित केली होती. यावर्षी १२ ऑगस्ट रोजी देशांतर्गत हवाई प्रवास महाग झाला आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने भाड्याच्या खालच्या आणि वरच्या मर्यादा ९.८३ वरून १२.८२ टक्के केल्या होत्या.