मुक्तपीठ टीम
आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली पतसंस्था म्हणजे बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. या पतसंस्थेवर आयकर विभागाची सलग दुसऱ्या दिवशी झाडाझडती सुरुच आहे. मंत्री अशोक चव्हाणांशी संबंधित चार साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाप्रकरणी आयकर खात्याकडून बुलडाणा अर्बनची चौकशी सुरु असल्याची चर्चा आहे. बुधवारी सकाळपासून ११ जणांचं आयकर विभागाचं पथक पतसंस्थेत दाखल झालं होतं.
नेमकं प्रकरण काय?
- सहकार क्षेत्रातील नावाजलेल्या बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये आयकर विभागाने मागील दोन दिवसांपासून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे.
- २७ ऑक्टोबरपासून ही कारवाई सुरु आहे.
- महाविकास आघाडीतील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हण यांच्या नांदेड जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जासंदर्भात ही तपासणी असल्याची माहिती आहे.
- त्यामुळे अशोक चव्हाण हे आयकर खात्याच्या रडारवर असलयाचे बोलले जाते.
आयकर विभागाचा घटनाक्रम
- बुलडाणा अर्बनच्या मुख्य शाखेत बुधवारी सकाळपासून एक ११ जणांचं आयकर विभागाचं पथक पतसंस्थेत दाखल झालं होतं.
- या पतसंस्थेमार्फत झालेल्या काही विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झालेलं होतं.
- रात्रभर हे पथक बुलढाणा अर्बनच्या मुख्य कार्यालयात विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करत होतं.
- तसेच सलग दुसऱ्या रात्रीही या पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली.
- दरम्यान बुलढाणा अर्बनच्या मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- आयकर विभागाच्या पथकाकडून या पतसंस्थेतंर्गत झालेल्या व्यवहारांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.
- पथकातील सर्व अधिकारी वर्ग हा परराज्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
- आयकर विभागाच्या एसटीएफ विभागाकडून हे सर्व्हेक्षण सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.
- प्रामुख्यानं उच्च-मूल्याच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी, प्राप्तिकर कायद्याने आर्थिक व्यवहारांचं विवरण किंवा अहवाल करण्यायोग्य खात्यांचे प्रामुख्येने हे सर्व्हेक्षण होत असल्याची माहिती मिळाली आहे
आशियातील सर्वात मोठी पतसंस्था
- आशियातील सर्वात मोठी पतसंस्था म्हणजे बुलडाणा अर्बन.
- ही पतसंस्था बरीच मोठी असून ५ राज्यात ४६५ शाखांचा कारभार चालतो.
- पतसंस्थेने १० हजार ठेवींचा विक्रम पार केला.
- ६०० च्या वर वेअर हाऊस आहेत.
- ५००० कर्मचारी काम करतात.
- या पतसंस्थेला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत.
- संस्थेचे अनेक कोल्ड स्टोरेज असून या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल साठवणूक आणि योग्य भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते.
- संस्थेसोबत बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टसुद्धा आहे.
- ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णवाहिका, २२ इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि १८०० कर्मचारी आहेत.
- शिवाय लवकरच बुलडाणा अर्बन परिवार राज्यातील ३ साखर कारखाने कार्यान्वित करणार आहे.
हे ही वाचा: बुलढाणा अर्बन पतसंस्था… एका जिल्ह्यातील पतसंस्था, पण बँकांनाही मागे टाकणारी प्रगती!