मुक्तपीठ टीम
उत्तरप्रदेशातील कनौजचे अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्याकडे कोट्यवधीची रोकड सापडल्यानंतर भाजपा नेत्यांनी त्यांचा संबंध समाजवादी पार्टीशी जोडला होता. त्यांनीच ‘समाजवादी’ या ब्रँडनेमने अत्तर लाँच केल्याचा दावाही करण्यात आला होता. पुढे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तो दावा चुकीचा ठरवत ‘समाजवादी’ अत्तर पियुष जैन यांनी नाही तर समाजवादी पार्टीचे विधान परिषदेतील आमदार आणि अत्तर व्यापारी पुष्पराज जैन यांनी लाँच केल्याचे उघड केले होते. आता आयकर खात्याच्या पथकांनी पुष्पराज जैन उर्फ पंपी जैन आणि अयुब मियाँ यांच्या निवासस्थानावर आणि कारखान्यांवर छापे टाकले आहेत.
परफ्यूम व्यावसायिक पुष्पराज जैन अखिलेश यादव यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी नुकतेच ‘समाजवादी’ ब्रँडनेमने अत्तर लाँच केले होते. तेव्हापासून ते भाजपाच्या रेंजमध्ये आले होते. पण गेल्या आठवड्यात कनौजमधील अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्यावर आयकर खात्याची धाड पडली. त्यांच्याकडे कोट्यवधीचा काळा पैसा, सोनेही मिळाल्याच्या बातम्या आल्या. तेव्हा भाजपाने ते समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्या जवळचे असून त्यांनीच समाजवादी अत्तर लाँच केले होते, असेही म्हटले. त्यानंतर अखिलेश यादव यांनी खुलासा करत ते हे अत्तर व्यापारी नसून भाजपाची आणि आयकर खात्याची नेम धरण्यात चूक झाल्याचे म्हटले. पण आज अखिलेश कन्नौजमध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी येत असतानाच त्यांनी ज्यांचा उल्लेख केला त्या पुष्कराज जैन यांच्यावरही आयकर खात्याची धाड पडली.
समाजवादी पार्टीचा भाजपावर आरोप
- समाजवादी पक्षाने एमएलसी अत्तर व्यापारी पुष्पराज जैन उर्फ पंपी यांच्यावर केलेल्या कारवाईबद्दल भाजपावर आऱोप केले आहेत.
- समाजवादी पार्टीने ट्विट हल्ला करताना लिहिले आहे की, राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कन्नौजमध्ये पत्रकार परिषदेची घोषणा करताच भाजप सरकारने सपा आमदार पुंपी जैन यांच्यावर आयकर धाड घातली. भाजपाची भीती आणि राग स्पष्ट आहे. जनता भाजपाला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे.