मुक्तपीठ टीम
पंजाबमधील एका खासगी विद्यापीठातील शिकणाऱ्या ६० विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या घटनेने देशात खळबळ माजली. त्यातही ते व्हिडीओ एका विद्यार्थीनीनेच शूट करून पाठवल्याचा आरोप झाल्याने सर्वच हादरले. घटनेनंतर ८ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचाही दावा करण्यात आला. पण पोलिसांनी तो दावा फेटाळला. तसंच या प्रकरणात आरोप झालेल्या विद्यार्थीनीने फक्त स्वत:चाच व्हिडीओ बनवून तो मित्राला पाठवल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नेमकं काय घडलंय, ते स्पष्ट होत नसल्यानं वेगळंच गूढ निर्माण झालं आहे.
वसतिगृहातील मुलींनी व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणीची चौकशी केली आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. आरोपी विद्यार्थिनीचे म्हणणे आहे की, तिने दबावाखाली व्हिडीओ बनवले आहेत. या विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडीओ बनवून शिमला येथील मित्राच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.
विद्यार्थीनींचा आक्रोश…वातावरण तणावपूर्वक!
- विद्यार्थीनींनी निदर्शने सुरू केली आणि घोषणाबाजी सुरू केली. एका विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आला, तर काहींची प्रकृती खालावली.
- पोलिसांनी आरोपी विद्यार्थीनीला अटक केली आहे. त्याचबरोबर तिचा मित्र असणाऱ्या तरुणाला पकडण्यासाठी शिमल्याहून एक टीम पाठवण्यात आली आहे.
- मात्र, एसएसपी विवेकशील सोनी यांनी या संपूर्ण प्रकरणाचा इंकार केला आहे. आरोपी तरुणीने केवळ स्वतःचे व्हिडीओ पाठवले असल्याचे उघड झाल्याचे त्यांनी सांगितले.
- तसेच ते म्हणाले की, आंदोलनादरम्यान एका मुलीची प्रकृती खालावली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, कोणाचाही मृत्यू झालेला नाही.
महिला आयोगाकडून गंभीर दखल
- घटनेची माहिती मिळताच पंजाब सरकारने कारवाई केली आणि आरोपींना सोडले जाणार नाही असे सांगण्यात आले.
- पंजाब राज्य महिला आयोगाने विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना या प्रकरणी न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले.
- या संपूर्ण प्रकरणाचे सत्य सात दिवसांत समोर येईल, असे आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी सांगितले. यासोबतच वसतिगृहाच्या वॉर्डनचीही चौकशी करण्यात येणार आहे.