मुक्तपीठ टीम
केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई आता दिल्लीत जोरात सुरु झाली असल्याची चर्चा आहे. दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावरील ईडी कारवाईनंतर आता आपचे दोन आमदार सीबीआयच्या रडावर आले आहेत.
दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमधील चालकांची बदली आणि पोस्टिंगवर कथितपणे प्रभाव टाकल्याबद्दल आम आदमी पक्षाचे दोन आमदारांची सीबीआय चौकशी करणार आहे.
लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे उपमहाव्यवस्थापक शकील अहमद यांनी चौकशीदरम्यान दावा केला की, अनेक आमदार हे ड्रायव्हर आणि इतर डीटीसी कर्मचाऱ्यांच्या बदली आणि पोस्टिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अहमद यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, सुलतानपूर माजरा येथील मुकेश अहलावत आणि बुरारी येथील संजीव झा या दोन आमदारांनी पोस्टिंगसाठी दबाव टाकण्यासाठी त्यांना पत्र लिहिले होते.
“अशा शिफारशींचा व्यवहार झाला का? हा सीबीआयचा तपास करण्याचा विषय आहे आणि सीबीआय याचा तपास करत आहे” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.