मुक्तपीठ टीम
कोरोना काळात भीतीने जवळचे नातेवाईकही दूर झाले, अशावेळी गरजूंच्या मदतीसाठी पोलिसांचे हात पुढे आले. कुठे जेवण, औषध पोहोचवले, तर कुठे मुलगा, मुलगी बनून अग्नी दिला. मुंबईतील एक पोलीस काँस्टेबल ज्ञानदेव प्रभाकर वारे हे सतत बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करीत आहेत. कोरोना संकटातही ते मागे फिरलेले नाहीत. वारे ज्यांचे अंत्यसंस्कार करतात, त्यापैकी बरेच मृतदेह अशांचे असतात, ज्यांचे नातेवाईक आहेत, परंतु संसर्ग झाल्यामुळे त्यांनी मृतदेहाला हात लावण्यासही नकार दिला.
ज्ञानदेव वारे हे ताडदेव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. जर मृतदेह हिंदूंचा असेल तर स्मशानभूमीत दहन करण्यात येते आणि जर मृतदेह मुस्लिम धर्मियांचा असेल तर कब्रस्तानात दफन केले जाते. ज्ञानदेव वारे हे काम गेली २० वर्षे अर्थात २००१ पासून सातत्याने करत आहेत, पण गेल्या काही दिवसांत त्यांचे काम खूप वाढले आहे. आतापर्यंत हजारो मृतदेहांचे अंत्यसंस्कार केल्याचा दावा त्यांनी केला. ज्ञानदेव वारे यांनी सांगितले की, ते मृतदेह पोलीस व्हॅनमधून किंवा कधीकधी रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत घेऊन जातात.
ज्ञानदेव वारे यांची समाजाप्रती असलेली कळकळ लक्षात घेत मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ५ हजारांचा धनादेश देऊन त्यांचा गौरव केला. त्यांना काँस्टेबलमधून हेड काँस्टेबल पदावर बढती देण्यात आली आहे. या कामात कुटुंबीय त्यांचे पूर्ण सहकार्य करीत आहेत.
पाहा व्हिडीओ: