मुक्तपीठ टीम
“सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना जगभरात विस्ताराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. युरोप, मध्य आशिया व आफ्रिकन खंडातील देशांत भारतीय उद्योजकांना अनेक क्षेत्रात व्यापार वाढीची संधी आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी ‘एमएसएमई’ अंतर्गत व्यवसायाची नोंदणी करावी. ‘एमएसएमई’ला सक्षम करण्यात ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमने घेतलेला पुढाकार उल्लखेनीय आहे,” असे मत कस्टम व जीएसटीचे सहआयुक्त हेमंतकुमार तांतिया यांनी व्यक्त केले.
ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (जीआयबीएफ) व आरडी रियल्टी यांच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापाराच्या संधी’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात तांतिया बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील ‘एमसीसीएआय’मध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी कोस्टारिकाचे राजदूत क्लाऊडिओ अनसॉरेना (ऑनलाईन), केनियाचे उच्चायुक्त जारेड मेथिका, मॉरिशसचे कौन्सिल सिवराज नंदलाल, ‘जीआयबीएफ’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, ग्लोबल कोऑर्डिनेटर दीपाली गडकरी, आरडी रिअॕलिटीचे अनुराग कश्यप आदी उपस्थित होते. यावेळी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘बिझनेस एक्सलन्स अवार्ड’ प्रदान करण्यात आले.
हेमंतकुमार तांतिया म्हणाले, “डॉ. जितेंद्र जोशी ‘जीआयबीएफ’च्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्याने ‘एमएसएमई’ला उभारी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नवउद्योजक व एमएसएमई दोघांनाही याचा फायदा होईल. काही देशांत कच्चा माल मिळतो, तर इतरत्र त्यावर प्रक्रिया होते. पेट्रोल, जेम्स, ज्वेलरी, हिरे, सोने आदी क्षेत्रात भारत उत्पादनाचा स्रोत नाही. मात्र, आपल्याकडे त्यावर प्रक्रिया होत असल्याने मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. अनेक व्यवसायात भारताचे योगदान मोठे आहे. अशा सर्व उद्योगांना हेरून ‘एमएसएमई’मध्ये आणावे.”
जोखीम घेण्याची तयारी असेल, तर व्यवसाय चांगला होऊ शकतो असे सांगत उद्योगाने आत्मविश्वास दुणावल्याचे अनुराग कश्यप यांनी सांगितले. कोस्टारिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध चांगले असून, भारतीयांना आम्ही व्यापाराच्या संधी उपलब्ध करून देऊ असे क्लाउडिओ अनसॉरिनो यांनी नमूद केले.
सिवराज नंदलाल यांनी मॉरिशसचे उद्योग धोरण लवचिक असून, तेथील निसर्गरम्य वातावरणात व्यवसाय आणखी बहरेल असे सांगत भारतातील उद्योगधंद्याना आमंत्रित केले. केनियामध्ये उद्योगांचे नोंदणीकरण आवश्यक आहे. जीएसटी ऐवजी व्हॅट असून, येथे उद्योगांना पोषक वातावरण दिले जात असल्याचे जारेड मेथिका यांनी सांगितले. छोट्या व्यावसायिकांनी ‘एमएसएमई’कडे नोंदणी करून या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.