घरफोडीप्रकरणी चार रेकॉर्डवरील आरोपींना दहिसर पोलिसांनी चोरीच्या मुद्देमालासह अटक केली आहे. नवीन वर्षांच्या सेलेब्रिशनसाठी पैशांची गरज असल्याने या चौघांनी ही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती.
अटक आरोपींमध्ये रसुल सनी लुझारिया, शमीम मुन्ना विश्वास, जोहरअली मेहबूबअली शेख आणि अब्दुल रजाक अब्दुल मुनाफ अन्सारी यांचा समावेश आहे. दहिसर येथील बबलीपाडा परिसरात २९ डिसेंबरला एका फ्लॅटमध्ये काही अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि कॅश असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला होता. हा प्रकार नंतर उघडकीस येताच तक्रारदारांनी दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे, परब, शेख, तटकरे, शिरसाठ, मोहिते, सांगळे, हिरेमठ यांनी जोहरअली, शमीम, अब्दुल आणि रसुल या चौघांना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते, त्यांच्या चौकशीत ते चौघेही मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
नवीन वर्ष साजरा करण्यासाठी त्यांनी ही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. या आरोपींकडून पोलिसंनी सोन्याचे, चांदीचे दागिने आणि पंधरा हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे. चोरीचे दागिने ते त्यांच्या परिचित व्यक्तींना कमी किंमतीत विक्री करीत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.