मुक्तपीठ टीम
देशात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहीम ही खूप धीम्या गतीने पार पाडली जात आहे. अशातच देशातील काही पंच तारांकित हॉटेल्सनी खाजगी हॉस्पिटल्सच्या सहकार्याने लसीकरण पॅकेज द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे केंद्राने अशी हॉस्पिटल्स आणि हॉटेलांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत.
“हॉटेल, हॉस्पिटल आणि लसीकरण!”
- देशाच्या मुंबई, हैदराबादसह काही महानगरांमधील काही पंचतारांकित हॉटेलनी खासगी हॉस्पिटल्सशी करार करुन असे पॅकेज ऑफर केले आहेत.
- या पॅकेजमध्ये लसीकरणाचा खर्च, ब्रेकफास्ट, डिनर आणि हॉटेलमध्ये मुक्काम यांचा समावेश आहे.
- यासोबतच जर ग्राहकांना पाहिजे असेल तर आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्लाही देण्याची अतिरिक्त सोय उपलब्ध आहे.
लसीकरण पॅकेज म्हणजे लसीकरण तत्वांचे उल्लंघन
- सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शन तत्वांचे हे उल्लंघन आहे.
- सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्राने पत्रं लिहिले आहे.
- काही खासगी हॉस्पिटल्स आणि हॉटेल्स एकत्रित मिळून लसीकरणाचे पॅकेज देत असल्याची बाब आरोग्य मंत्रालयाच्या निदर्शनास आल्याचे अवर सचिव मनोहर अगनानी यांनी सांगितले आहे.
- हा प्रकार म्हणजे नॅशनल कोविड व्हॅक्सिनेशन प्रोग्रामच्या मार्गदर्शन तत्वांचे उल्लंघन आहे.
- हा प्रकार तात्काळ बंद झाला पाहिजे, असं या पत्रातून नमूद करण्यात आले आहे. संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पत्रात अग्निनी यांनी लिहिले आहे की राष्ट्रीय कोरोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत सरकारी कोरोना लसीकरण केंद्र आणि खाजगी कोरोना लसीकरण केंद्र, कार्यालय, बुजुर्ग आणि दिव्यांगांसाठी ग्रुप हौसिंग सोसायटी वगळता इतर कोणत्याही ठिकाणी लसीकरण करता येणार नाही. म्हणून हॉटेल्समध्ये लसीकरण या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे आणि त्वरित थांबवावे.