मुक्तपीठ टीम
राज्यात कोरोना मंदावत असताना नुकतीच दहावी- बारावी बोर्डाच्या परीक्षा या वेळेवर आणि ऑफलाईन घेण्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. मात्र परीक्षा ऑनलाईनच घ्यावी या मागणीसाठी सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील राहत्या घराबाहेर घेराव घातला. या विद्यार्थ्यांनी धारावी परिसरात आंदोलन केली. दरम्यान ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी भडकवल्याच्या आरोपाखाली यूट्युबर ‘हिंदुस्तानी भाऊ’ उर्फ विकास फाटक याला अटक केली. धारावी पोलिसांनी ही कारवाई केलीय. हिंदुस्तानी भाऊवर वेगवेगळ्या कलमांतर्गत धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे हिंदुस्थानी भाऊ? त्याचं नाव का येत आहे आंदोलनात?
- खरं तर, सोमवारी अनेक विद्यार्थ्यांनी १०वी आणि १२वी बोर्डाच्या परीक्षांच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात धारावीच्या परिसरात आंदोलने केली.
- विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊच्या चिथावणीखोर व्हिडिओनंतर हे आंदोलन करण्यात आल्याचे समजते. अलीकडेच एका लाइव्ह व्हिडिओमध्ये, प्रसिद्ध यूट्यूबर हिंदुस्थानी भाऊ यांनी ऑफलाइन परीक्षांच्या मुद्द्यावरून १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांची चिंता व्यक्त केली.
- व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊने सांगितले आहे की, “जो गोंधळ सुरू आहे तो होऊ नये, शक्य झाल्यास उद्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्या.
- नाही तर मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करेन.
- मी तोपर्यंत थांबणार नाही, जोपर्यंत त्यांना न्याय मिळेल. तुम्हाला मला तुरुंगात टाकायचे असेल तर मला टाका, तुम्हाला जे करायचे ते करा, मला पर्वा नाही.
काय म्हणाले मुंबई पोलीस
- ‘हिंदुस्थानी भाऊ’ उर्फ विकास फाटक याने ऑफलाइन परीक्षेला विरोध करण्यासाठी धारावी परिसरात विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावीतील अशोक मिल नाक्याजवळ फाटक यानेच विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते, असे प्रथमदर्शनी पुरावे आहेत.