मुक्तपीठ टीम
हिमाचल प्रदेशातील ६८ विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू असताना यावेळी कॉंग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, कॉंग्रेसने एकूण ४० जागा जिंकल्या असून, भाजपने आतापर्यंत २५ जागा जिंकल्या आहेत. तर, इतर पक्षांनी ३ जागा जिंकल्या आहेत. आपचे खाते उघडलेले नाही. त्याचवेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला आहे. आता भाजपाने पुढील जबाबदारी मराठी नेत्यांवर सोपवल्याची चर्चा आहे.
मतमोजणीवेळी, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालेले आहे. मात्र, या चुरशीच्या लढतीत भारतीय जनता पक्ष हार मानायला तयार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना शिमल्यात पाठवण्यात आले आहे. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे.
पराभवानंतर सत्ता मिळवण्यासाठी भाजपाची तयारी!
- आता अशा परिस्थितीत नेत्यांच्या पक्षपरिवर्तनासह अनेक शंका उपस्थित होत आहेत.
- भाजप सरकार स्थापनेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू शकते, असे बोलले जात आहे.
- अशा स्थितीत एक-दोन जागांवर प्रकरण अडकले, तर भाजप अपक्ष उमेदवारांची मदत घेऊ शकते.
- आघाडी मिळालेल्या तीन अपक्ष उमेदवारांपैकी दोन उमेदवार भाजपचे बंडखोर नेते आहेत. अशा परिस्थितीत अपेक्षित सरकार स्थापन करण्यासाठी या उमेदवारांशी संपर्क साधता येईल.
- काँग्रेसचे अनेक नेतेही भाजपच्या संपर्कात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, ही केवळ अफवा आहे की त्यात तथ्य आहे, हे अजूनही समजलेले नाही.