“तेरे बिना क्या जीना ” यासारखा हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या. एक सुर्य, एक चंद्र , एकच आमच्या लतादीदी. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयचं नव्हे तर जागतिक संगीत विश्वाला पडलेलं एक स्वप्न होतं. लतादीदींच्या निधनाने संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे, भारतीय संगीत विश्व आज खऱ्या अर्थाने पोरके झाले आहे, अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना मुंबईकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
मूर्तिमंत सरस्वती आज खऱ्या अर्थाने हरपली आहे. त्या संगीताबरोबर चार पिढ्यांचा तृप्त करणारा सूर तोही आज हरपला आहे. आजचा दिवस संपूर्ण देशाला अतिशय दुःखद वेदना देणारा आहे. मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव त्यांची आठवण देत राहतील. या दुःखद प्रसंगात मी आणि संपूर्ण मुंबईकर मंगेशकर कुटुंबीयांसोबत त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली आहे.