हेरंब कुलकर्णी
कोरोनात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ५०,००० रुपये देण्याचा शासन निर्णय काल विजय वडेट्टीवार यांच्या मंत्रालयाने प्रसिद्ध केला. त्याच्या अगोदरच्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षाच्या वतीने निवेदन प्रसिद्ध करून कोरोनात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी करून त्यातील एक लाखाची रक्कम राज्य सरकारने द्यावी असे म्हटले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही चार लाख रुपये देण्याची भूमिका मांडली आहे.अशा निवेदनानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच पक्षाचे ज्येष्ठ मंत्री विजय वडेट्टीवार एक लाखाचा जीआर न काढता फक्त पन्नास हजाराचा जीआर काढतात. याचा अर्थ काय घ्यायचा ?
काँग्रेस पक्षाची भूमिका वडेट्टीवार यांना मान्य नाही का ?
विधिमंडळ पक्षाने हे निवेदन काढताच घाईघाईने ५०,०००चा जीआर काढण्यात पक्षाची भूमिका नाकारण्याचाच प्रयत्न दिसून येतो. हे एक लाख देऊन केंद्र सरकारने उरलेले तीन लाख देण्यासाठी खरे तर काँग्रेस पक्षाने आंदोलन उभारायला हवे.
आम्ही त्याच दिवशी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे अभिनंदन करून असे आंदोलन उभे केल्यास ‘कोरोना एकल पुनर्वसन समिती’ चे कार्यकर्ते त्यात सहभागी होतील असे म्हटले होते परंतु आपल्याच राज्य सरकारलाच काँग्रेस पक्ष जास्तीचे ५०,००० द्यायला लावत नसेल तर केंद्राने आणखी ३ लाख द्यावे हे ते कोणत्या तोंडाने सांगणार..?
तेव्हा विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या भूमिकेचा आदर करून काल काढलेला जीआर मागे घ्यावा व एक लाख रुपये मदत दिली जाईल असा नवा जीआर प्रसिद्ध करावा ही विनंती. या जीआर मध्ये निकटचे नातेवाईक असा भोंगळा शब्द वापरला आहे. आजच कोरोनात विधवा झालेल्या अनेक महिलांना माहेरी जायला भाग पाडण्यात आले आहे इस्टेटीचा वाटा दिला जात नाही अशा अनेक तक्रारी आमच्या कार्यकर्त्यांकडे सातत्याने येत आहेत.दवाखान्याची कागदपत्रे त्यांना दिली जात नाहीत. अशावेळी निकटचे नातेवाईक हा भोंगळा शब्द वापरून घराघरात संघर्ष निर्माण होणार आहे. तेव्हा मृत झालेली व्यक्ती पुरुष असल्यास पुरुषाची पत्नी असा स्पष्ट उल्लेख करायला हवा व पत्नी नसेल तर निकटच्या नातेवाईकांचा वारस क्रम द्यायला हवा. अन्यथा यातून अनेक कौटुंबिक संघर्ष निर्माण होतील.
तेव्हा काँग्रेस पक्षानेसुद्धा वडेट्टीवार यांच्या मंत्रालयाच्या जीआर बाबत भूमिका स्पष्ट करावी..