मुक्तपीठ टीम
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करताना, शिवाजी महाराज हे जुन्या काळातले नायक होते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे अशी बातमी आज सर्वत्र पसरली. त्यामुळे शिवप्रेमी सुखावले नाही तोच ती बातमी अफवा असल्याचं स्पष्ट झालं. कोश्यारी यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे ही भावना व्यक्त केल्याची चर्चा होती, मात्र, राजभवनाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याची बातमी तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजप सोडून इतर सर्व पक्षांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांनीदेखील राज्यपालांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. उद्धव ठाकरे यांनी चिखलीतल्या सभेत महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करण्याची राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत.
काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?
- औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापाठीच्या पदवी प्रदान कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते.
- राज्यपाल कोश्यारी म्हणाले, की मला राज्यात आल्यावर दोनदा गडकरी आणि पवार यांना पदवी देण्याचे भाग्य लाभले.
- शरद पवार हे राग आला तरी साखरेपेक्षा अधिक गोड असतात. ध्येय असणारे नेते आहेत.
गडकरी यांना तर रोडकरी देखील म्हणतात. - तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही.
- इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.
- शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय.
- डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला ते इथेच मिळतील.