मुक्तपीठ टीम
१९७७ सालात राजा ढाले यांचा बरखास्तीचा निर्णय धुडकावून लावत दोनच महिन्यांत दलित पँथरला संजीवनी दिलेल्या मराठवाड्याने यंदा साजऱ्या होणाऱ्या पँथरच्या सुवर्ण महोत्सवात भारतीय दलित पँथरच्या पुनरुज्जीवनासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे.
पँथरचे मराठवाड्यातील अग्रणी अॅड रमेशभाई खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली आज क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत पँथर्सची एक बैठक झाली. खारघर येथील सत्याग्रह कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांतील पॅंथर्स सहभाग झाले होते.
या बैठकीत भारतीय दलित पँथरचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक संपर्क समिती स्थापन करण्यात आली. ही समिती पुढील दोन महिन्यांत मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या प्रदेशांचा दौरा करणार आहे. त्यातून राज्यभरातील पँथर्ससहित छोट्या मोठ्या सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी- तरुण यांच्याशी एकूणच मागास समूहांच्या ज्वलंत प्रश्नांवर संवाद साधण्यात येणार आहे.
या समितीमध्ये निमंत्रक : अॅड रमेशभाई खंडागळे, मुंबई: प्रा डॉ जी के डोंगरगावकर, आनंद कांबळे, ठाणे: प्राचार्य रमेश जाधव, प्रा एकनाथ जाधव, नवी मुंबई: प्रा महेंद्र सूर्यवंशी, औरंगाबाद: सुभाष ठोकळ, ऍड विजय जाधव, नांदेड: दशरथ लोहबंदे ( जिल्हा परिषद सदस्य), जालना: शिवाजी आदमाने, लातूर : संजय कांबळे, बुलडाणा: संतोष तायडे, निलेश वानखेडे, परभणी : राहुल मोगले, बीड: किसन तांगडे, उस्मानाबाद: विश्वनाथ तोडकर, नंदुरबार: रवी गोसावी यांचा समावेश आहे.
राज्यव्यापी दौऱ्यानंतर सर्व प्रदेश आणि जिल्ह्यातील पँथरच्या पुनरुज्जीवनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा संपर्क समितीमध्ये समावेश करण्यात येईल, असे रमेशभाई खंडागळे यांनी आजच्या बैठकीत जाहीर केले.
- १९७० च्या दशकात देशभरात दलितांवर वाढलेल्या हिंसक अत्याचारांविरोधात तरुणांच्या संतापाच्या उद्रेकातून दलित पँथर जन्माला आली होती. आजची परिस्थिती त्याहून वेगळी आणि अधिक भयावह आहे. आता दलित नुसते असुरक्षित नाहीत, तर त्यांना सुरक्षिततेची हमी देणारे संविधान आणि लोकशाहीसुद्धा संकटात सापडली आहे.
अॅड रमेशभाई खंडागळे
निमंत्रक, भारतीय दलित पँथर
पुनरुज्जीवन संपर्क समिती.
मो: 9545078631