मुक्तपीठ टीम
भारताला यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये आजवरचं सर्वात चांगलं यश मिळतंय. नेमबाजीत अवनी लेखारानं सुवर्णपदक मिळवलं. इतरही खेळाडू पदकांची कमाई करतायत. या खेळाडूंवर भेटींचा वर्षाव होऊ लागलाय. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अवनीला महिंद्राची खास एसयूव्ही भेट देणार असल्याचं जाहीर केलंय. तर एमजी मोटरने रौप्य पदक विजेत्या भाविना पटेलला नवीन कारने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. इतरही खेळाडूंना भेट आणि पुरस्कारांनी गौरवलं जात आहे.
अवनीला महिंद्रा एसयूव्ही नेमबाजीत अवनी लेखारा नावाची ही खेळाडू पॅरालिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी देशातील पहिली महिला ठरली आहे. तिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडिंग (एसएच१) स्पर्धेत पदक जिंकले. तिच्या या यशासाठी महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी तिला आणि इतर चॅम्पियनसाठी खास भेट जाहीर केली. आनंद यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, कंपनी शूटर अवनी लेखारासाठी “स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) समर्पित करेल.
भाविनाला एमजीची कार एमजी मोटरने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडू भाविना पटेलला नवीन कारने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा यांनी ही घोषणा केली. भारताच्या पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल ही भारतासाठी पॅरालिम्पिक पदक जिंकणारी पहिली टेबल टेनिस खेळाडू आहे.
अवनीसाठी महिंद्रांची एसयूव्ही
- पॅरालिम्पिक सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय असण्याबरोबरच अवनी लेखारा हिने २४९.६ गुणांसह नवीन पॅरालिम्पिक विक्रम प्रस्थापित करण्याचा मान मिळवला.
- जयपूरमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय अवनीला २०१२ मध्ये एका कार अपघातात पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती.
- पॅरालिम्पिक गेम्समध्ये हा एक नवीन विक्रम आहे. या विजयासह अवनीने युक्रेनच्या इरियाना शेटनिकच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी केली आहे.
- अवनीला महिंद्राची एसयूव्ही गाडी भेट मिळणार आहे.
भाविनाला मिळणार कोणती कार?
- भाविना पटेल यांना कोणती कार भेट देणार आहे हे पूर्णपणे स्पष्ट केलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी एसयूव्ही एस्टर भाविनाला भेट देईल.
- एमजी मोटर्स कार उत्पादक लवकरच भारतीय बाजारपेठांसाठी एस्टर नावाची नवीन एसयूव्ही बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
- एमजी एस्टर एसयूव्ही, हेक्टर, हेक्टर प्लस, ग्लॉस्टर आणि झेडएस ईव्ही एसयूव्ही नंतर भारतातील चीनी मालकीच्या ब्रिटिश कार उत्पादकाकडून देशातील ही पाचवी कार असेल.