मुक्तपीठ टीम
खादीच्या सातत्याने वाढणाऱ्या लोकप्रियतेमुळे या वस्त्रप्रकाराची परदेशी राजदूतांनाही भुरळ पडली असून त्यामुळेच थायलंडचे भारतातील राजदूत एच ई एमएस पट्टरट हाँगटाँग आणि ओमानचे भारतातील राजदूत इस्सा ऐशीबानी यांनी इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर-२०२२ (आयआयटीएफ) मधील खादी दालनास आज भेट दिली.
खादीच्या जागतिक लोकप्रियतेची राजदूतांनी प्रशंसा केली असून त्यांनी महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांसोबत खादी दालनातील सेल्फी स्थळावर सेल्फीही काढून घेतली. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे संचालक(प्रसिद्धी) संजीव पोसवाल यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही राजदूतांनी खादी इंडिया दालनात असलेल्या वेगवेगळ्या खादी वस्त्रप्रावरणांच्या वैविध्याची आणि खादी कारागिरांच्या उत्कृष्ट कलाकुसरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
राजदूतांनी चरख्यावर सूत कताई करण्याचे तसेच चिकणमातीची भांडी बनवण्याचे, अगरबत्ती आणि हाताने कागद बनवण्याचे प्रात्यक्षिक पाहिले. तसेच राजदूतांनी खादी वस्त्रप्रावरणांपासून बनवण्यात आलेल्या उत्कृष्ट हस्तकलेचे सादरीकरण करणाऱ्या दालनास आणि तयार कपडे, वनौषधींपासून आरोग्य उत्पादने आणि विविध प्रकारची ग्रामोद्योग उत्पादने ठेवलेल्या दालनांनाही भेट दिली.
थाई राजदूत म्हणाले की, आयआयटीएफमध्ये इतक्या भव्य प्रमाणावर खादी दालन उभारल्याबद्दल मी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अभिनंदन करतो. या दालनाने खादी कारागिरांना आपापल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. भारत आणि थायलंड यांच्यात खादीची एक विशेष जुळणारी तार आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी खादीला जागतिक स्तरावर उत्तेजन देण्यासाठी एकत्र काम करण्याचे मार्ग शोधावे, असे ते म्हणाले.