मुक्तपीठ टीम
अतिवृष्टीमुळे आसाममध्ये महापूर आला आहे. आसाममध्ये अतिवृष्टीमुळे नद्या-नाल्यांना महापूर आला आहे. अनेक भागात पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. तर कचार भागात पुराच्या पाण्यात ट्रेन अडकली आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये दोन लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. ६५२ गावे पुरामुळे प्रभावित झाली आहेत. १६ हजार ६४५ हेक्टर जमीन पुराच्या पाण्याने वाहून गेली.
सात लोक मरण पावले
- आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, कचार, चरैदेव, दरंग, धेमाजी, दिब्रुगढ आणि दिमा-हसाओसह २४ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत २,०२,३८५ लोक प्रभावित झाले आहेत.
- पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
- याशिवाय अनेक लोक बेपत्ता आहेत.
- प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
- कचारमध्ये जिल्हा प्रशासनाने ५५ मदत शिबिरे आणि १२ वितरण केंद्रे स्थापन केली आहेत.
- सुमारे ३३ हजार पूरग्रस्तांनी येथे आश्रय घेतला आहे.
अनेक भागात भूस्खलन
- मुसळधार पावसामुळे अनेक भागात भूस्खलनही झाले आहे.
- न्यू कुंजांग, फियांगपुई, मौलहोई, नामजुरंग, दक्षिण बगेतर, महादेव टिला, कालीबारी, उत्तर बागेतर, जिओन आणि लोदी पांगमौल या गावांमध्ये भूस्खलन झाल्याची माहिती मिळाली आहे.
- दरड कोसळल्याने जटिंगा-हरणगाव आणि माहूर-फिडिंग येथील रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे.