मुक्तपीठ टीम
देशात पहिल्यांदाच हृदयाची रोबोटिक शस्त्रक्रिया ही यशस्वीरित्या करण्यात आली आहे. चंदीगढ पीजीआयमध्ये हृदयाचा आजार असलेल्या रुग्णावर यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर या शस्त्रक्रियेमध्ये वापरण्यात आलेला बायो-ऑब्झर्व्हल स्टेंट देखील रुग्णाच्या शरीरात २ ते ३ वर्षात पूर्णपणे विरघळेल. कोरोनरी सिंड्रोम असलेल्या रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे.
पीजीआयच्या अॅडव्हान्स्ड कार्डियाक सेंटरचे प्रमुख प्रोफेसर यशपाल शर्मा यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली
- पीजीआयच्या अॅडव्हान्स्ड कार्डियाक सेंटरचे प्रमुख प्रोफेसर यशपाल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीजीआय हे देशातील पहिले केंद्र आहे, जिथे रोबोट असिस्टेड पीसीआय करण्यात आले आहे.
- या शस्त्रक्रियेमुळे जिथे रुग्णाला चांगले उपचार मिळतील, तिथे डॉक्टरांना रेडिएशनच्या दुष्परिणामांचा धोकाही खूप कमी झाला आहे.
- रोबोटिक पीसीआय प्रशिक्षण यापूर्वीच केले गेले आहे परंतु प्रथमच या तंत्राने ४७ वर्षीय कोरोनरी हृदय रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
- रोबोटिक पीसीआय शस्त्रक्रियेचा उच्च दर्जाचा क्लिनिकल परिणाम असतो तसेच कॅथ लॅबमध्ये रेडिएशनच्या दुष्परिणामांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
कोरोनरी सिंड्रोम असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांना तासंतास क्ष-किरणांमधून उत्सर्जित होणाऱ्या रेडिएशनला सामोरे जावे लागत होते, मात्र रोबोटिक तंत्रज्ञानामुळे ही परिस्थिती आता टाळता येणार आहे. यामध्ये फक्त रुग्णाला कॅथ लॅबमध्ये राहावे लागते. कॅथ लॅबच्या बाहेरून डॉक्टर कॉम्प्युटर आणि रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया करू शकतात.