मुक्तपीठ टीम
साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणं आता विदर्भातील साईभक्तांसाठी अगदीच सोपं जाणार आहे. वेळ तेवढाच कमी जेवढा मुंबईकर साईभक्तांना लागतो. त्याचं कारण मुंबई ते नागपूर असणाऱ्या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकरच सुरु होतोय.
अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर समृद्धी महामार्गाच्या एका टप्प्याचा उद्घाटनाचा शुभ मुहूर्त निघाला आहे. येत्या १५ ऑगस्टपासून शिर्डी ते नागपूरदरम्यान वाहतूक सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. याचा सर्वात मोठा फायदा व्यापारी, व्यावसायिक, कारखानदार, शेतकरी यांच्याप्रमाणेच सर्वात जास्त होणार आहे, तो नागपूर आणि विदर्भातील साईबाबांच्या भक्तांना.
मुंबई ते नागपूर दरम्यान बांधण्यात येत असलेला हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा विकासाचा सुपर हायवे मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरु असलेल्या या महामार्गामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना वेगवान वाहतुकीची सोय मिळणार आहे. मुंबई ते नागपूर दरम्यानच्या देशातील सर्वात हायटेक महामार्गाचे सुमारे ८५ टक्के काम आतापर्यंत झाले आहे. आतापर्यंत शिर्डी ते नागपूर दरम्यान या महामार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. लवकरच पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी दरम्यान हा महामार्ग खुला होणार आहे. पुढील वर्षभरात संपूर्ण महामार्ग खुला करण्याची सरकारची योजना आहे.
पुढील वर्षी संपूर्ण महामार्ग सुरू करण्यात येणार
- १७०१ किमी लांबीच्या महामार्गाचे सुमारे ८० टक्के नागरी काम पूर्ण झाले आहे.
- नागपूर ते मुंबई दरम्यानचा महामार्ग तीन टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे.
- पहिला टप्पा ऑगस्ट २०२२ मध्ये आणि संपूर्ण मार्ग २०२३ मध्ये खुला केला जाईल.
- पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी असा ५२० किमी लांबीचा महामार्ग खुला करण्यात येणार आहे.
- वर्षअखेरीस दुसऱ्या टप्प्यात ६२३ किमीचा महामार्ग सुरू करण्यात येणार आहे.
- तो नागपूर ते इगतपुरी हा महामार्ग असेल.
समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये…
- समृद्धी महामार्ग हा देशातील पहिला सर्वात लांब महामार्ग आहे, ज्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंती असतील.
- ७०० किमी महामार्गावर १४०० किमी सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे.
- इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.
- महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येक ४० ते ५० किमी अंतरावर वाहने चार्ज करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
- देशातील सर्वात आधुनिक टोल प्रणाली समृद्धी महामार्गावर वापरली जाणार आहे.
- याअंतर्गत वाहनचालकांनी जेवढा प्रवास केला तेवढाच टोल भरावा लागणार आहे.
- नवीन तंत्रज्ञानाअंतर्गत, वाहनचालकांनी एंट्री पॉइंटऐवजी महामार्गावरून बाहेर पडल्यावर टोल आकारला जाईल.