पूजा शिंदे / मुक्तपीठ टीम
लॉकडाऊनमध्ये जर कोणत्या गोष्टीला ब्रेक लागला नसेल तर ती गोष्ट म्हणजे मनोरंजन! OTT प्लॅटफॉर्मच्या कृपेने प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन चालूच आहे. पण चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची ती मजा सर्वच जण मिस करत होते. कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे देशभरातील जवळपास सर्वच चित्रपटगृहे उघडण्यात आली असून अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. हिंदी चित्रपटांच्या गर्दीत एक पहिला मराठी चित्रपट ‘जयंती’ प्रदर्शित होणार आहे.
‘जयंती’ प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत!
- जयंती हा लॉकडाउन नंतर चित्रपट गृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट आहे.
- यासोबतच आणखीही काही कारणांसाठी चित्रपट चर्चेत आहे.
- मागच्या आठवड्यात चित्रपटाचा ट्रेलर युट्युब वर प्रदर्शित करण्यात आला.
- अवघ्या एका आठवड्यात १२ लाख लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे.
- चित्रपटाच्या २ गाण्यांना देखील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.
- सुप्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोशल मीडिया वर ‘जयंती’चा ट्रेलर शेअर करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
कथेची उत्तम जाण असणाऱ्या आणि कथानक उत्कृष्टरित्या पडद्यावर मांडणाऱ्या सुप्रसिध्द दिग्दर्शकाने स्वतः या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत संपुर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. म्हणजे नक्कीच हा चित्रपट देखील उत्कृष्ट धाटणीतील असणार आणि प्रेक्षक नक्कीच हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असणार यात तिळमात्र शंका नाही.
दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित “जयंती” सिनेमा १२ नोव्हेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता ऋतुराज वानखेडे आणि अभिनेत्री तितिक्षा तावडे मराठी सिनेसृष्टीत प्रथम पदार्पण करत आहेत. त्याचप्रमाणे सिनेमामध्ये जेष्ठ अभिनेते वीरा साथीदार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, तसेच पॅडी कांबळे आणि अंजली जोगळेकर यांच्या देखील भूमिका आहेत.
आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांनी भारतभूमीला दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यामुळेच अशा महापुरुषांची जयंती साजरी करण्याची, त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याची आपल्याकडे परंपरा आहे. परंतु अलीकडच्या काही वर्षांत या सामान्य लोकांच्या भावनिक उत्सवाला सातत्याने राजकीय वळण दिले जात असल्याचे दिसुन येते. याच सर्व बाबींवर ‘जयंती’ चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.