मुक्तपीठ टीम
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेली ट्रॅक्टर रॅलीने आज हिंसक वळण घेतले आहे. शेतकरी आंदोलकांनी ठरलेले मार्ग सोडून दिल्लीत प्रवेश केला. काही शेतकरी आंदोलक थेट लाल किल्ला परिसरात घुसले. त्यांच्यापैकी काहींनी तिथे शेतकरी संघटनेचे आणि खालसा पंथाचे झेंडे फडकवले. अखेर जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. काही शेतकरी आंदोलकांनी पोलिसांवरच ट्रॅक्टर चढविण्यास आणि तोडफोड करण्यास सुरूवात केली. त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना कठोर कारवाई करावी लागली.
इंटरनेट सेवा बंद
शेतकरी येथून निघून गेले आहेत. पोलिसांनी आता सगळीकडे अधिक बंदोबस्त वाढवला आहे. या परिसरात इंटरनेटचा वेगही कमी करण्यात आला आहे. काही ठिकाणी रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरविल्या जाऊ नयेत.
शेतकरी नेत्यांकडून हिंसाचाराचा निषेध
संयुक्त किसान मोर्चाचे नेते योगेंद्र यादव यांनी काही शेतकरी आंदोलकांनी केलेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. कडक शब्दात अशा वागण्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकरी आंदोलकांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसा आणि तोड-फोडीमध्ये समाविष्ट होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले होते. तरीही अशा घटना घडल्यामुळे शेतकरी आंदोलनाचेच नुकसान होईल, असेही त्यांनी बजावले.
तसेच योगेंद्र यांनी, वर्दीतील जवानांवर वाहन चढवण्याचा प्रयत्न केला असेल तर ते निंदनीय आहे आणि पूर्णपणे शिस्तीच्या बाहेर आहे. आम्ही स्टेजवरुन वारंवार सांगत आलो आहोत की, वर्दीतील उभा असलेला हा तरुण एक शेतकरीच आहे. त्यामुळे अशी कोणतीही घटना घडल्यास आम्ही त्याचा पूर्णपणे निषेध करतो, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या हिंसाचाराबद्दल योगेंद्र यादव म्हणाले की, आंदोलनात हिंसाचार कुणी पसरवला हे आम्ही शोधून काढू. शेतकर्यांचा गोंधळ हा पेचात पाडणारा विषय आहे. तसेच लाल किल्ल्याच्या तटबंदीवर शेतकरी संघटनेचा झेंडा फडकविणे चुकीचे आहे. मी अशा प्रकारे निषेध व्यक्त करणार्या शेतकर्यांना शांतता बाळगण्याचे आवाहन करतो, असेही योगेंद्र पुढे म्हणाले.
तर भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत म्हणाले की, हि रॅली शांततेने काढण्यात येणार होती. मात्र, या रॅलीला मिळालेल्या हिंसक वळणाबद्दल आम्हाला काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.