मुक्तपीठ टीम
मुंबईत सध्या रस्त्यावर जरी केळी विकत घेतली तरी एका डझनला ४० रुपये मोजावे लागत आहे. मुंबईतील ग्राहकांना महाग दरानं केळी घ्यावी लागत असताना खानदेशातून आलेली बातमी ही मन विषण्ण करणारी आहे. खानदेशातल्या शेतकऱ्यांकडून व्यापारी केळी तोडणीला येत नसल्याने केळीचे घड झाडावरच पिकत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यासाठी व्यापारी केळीला मागणी नसल्याचे सांगतात. पण प्रत्यक्षात ही व्यापाऱ्यांची नेहमीची क्लुप्ती असून ते भाव पाडण्यासाठी तसं करतात, असं शेतकरी सांगतात.
व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान…
- नंदुरबार जिल्ह्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते.
- मात्र गेल्या तीन महिन्यांपासून केळीला योग्य भाव मिळत नाही आहे.
- जिल्ह्यात केळी तीन रुपये प्रति किलोने परवडत नसतानाही शेतकरी केळी व्यापाऱ्यांना देण्यास तयार आहेत.
- मात्र व्यापारी केळी काढण्यास तयार नसल्याने केळीचे घड झाडावर पिकत आहे.
- गेल्या चार पाच दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे केळी पिकण्याचे प्रमाण वाढले आहे.
- पिकलेले केळीचे घड शेतकरी काढून फेकत आहेत.
- त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
प्रशासनाने बैठक घेत मार्ग काढण्याची शेतकऱ्यांची मागणी
- केळी लागवडीपासून एकरी ५० ते ६० हजार रुपयांचा खर्च झालेला आहे.
- ऐन काढणीच्या वेळी व्यापारी मनमानी करत असतात.
- त्यात व्यापारी येत नसल्याने केळीचे घड झाडावर पिकत असल्याने प्रशासनाने व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक घेत मार्ग काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.