मुक्तपीठ टीम
भारतातील कोट्यवधी करदात्यांना आयकर विभागाने मोठा दिलासा दिला आहे. ज्या करदात्यांनी अजून २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी त्यांचे आयकर रिटर्न ई-सत्यापित केले नाही ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पडताळणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. आयकर विभागाने करदात्यांना दिलासा देत पडताळणीची मुदत वाढवली आहे.
आयकर कायद्यानुसार, डिजिटल स्वाक्षरीशिवाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आयकर रिटर्न भरण्यासाठी आधार कार्डचे ओटीपी, नेटबँकिंग, डीमॅट खात्याद्वारे पाठवलेला कोड, पूर्व-प्रमाणित बँक खाते किंवा एटीएम यांची पडताळणी आवश्यक आहे. ही पडताळणी आयकर रिटर्न भरल्यानंतर १२० दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे, आयकर करदाता आयटीआरची एक भौतिक प्रत बेंगळुरूमधील सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर म्हणजेच सीपीसी कार्यालयात पाठवून देखील सत्यापित करू शकतात. जर पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर रिटर्न भरले गेले नाही असे मानले जाते.
२०२०-२१ आयकर रिटर्नसाठी ५ कोटींपेक्षा जास्त आयटीआर दाखल
- आयकर विभागाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत ५ कोटींहून अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत.
- वैयक्तिक करदात्यांच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख, ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत विभागाने आधीच पाच महिन्यांनी वाढवली आहे.
- आयकर विभागाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, २९ डिसेंबरला संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत पाच कोटींहून अधिक रिटर्न भरले गेले आहेत.
- रिटर्न भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना आयटीआरची संख्या झपाट्याने वाढत आहे.
गेल्या वर्षी ५.९५ कोटी आयटीआर दाखल
- २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी, ५.९५ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते.
- यासाठी १० जानेवारी २०२१ पर्यंत मुदत वाढवण्यात आली होती.
- प्राप्तिकर विभागाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी आयटीआर सादर केलेल्या करदात्यांना दिलासा देत असे म्हटले आहे की, जे करदाते रिटर्नची ई-पडताळणी करत नाहीत ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करू शकतात.