मुक्तपीठ टीम
अरुणाचल प्रदेशातील सेला बोगदा प्रकल्पाचे खोदकाम पूर्ण झाले आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बीआरओने २२ जानेवारीला बोगद्यासाठी शेवटचा स्फोट घडवून आणला. सेला बोगदा १३ हजार फूट उंचीवर बांधलेला जगातील सर्वात मोठा डबल लेन बोगदा असेल. सेला बोगदा प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. चीनच्या सीमेवरील अरुणाचल प्रदेशातील हा बोगदा सैनिकांसाठी तवांग सेक्टरच्या पुढे जाण्यासाठी लवकरच गेम चेंजर ठरेल. संरक्षण मंत्रालया दिलेल्या माहितीनुसार, ९८० मीटर लांबीच्या बोगद्यासाठी शेवटचा स्फोट एका आभासी समारंभाद्वारे झाला. बीआरओचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी रिमोटद्वारे बटण दाबले. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग, पूर्व कामेंग आणि तवांग जिल्ह्यांना देशाच्या इतर भागांशी जोडणारा हा बारामाही एकमेव रस्ता आहे.
सेला बोगदा प्रकल्पाचे खास वैशिष्ट्य
- बोगदा १ आणि बोगदा २ प्रकल्पांतर्गत, तवांग आणि पश्चिम कामेंग जिल्ह्यांदरम्यान दोन बोगदे बांधले जात आहेत.
- १ हजार ५५५ मीटर लांबीचे ट्विन ट्यूब चॅनल तयार करण्यात येत आहे. दुसरा बोगदा ९८० मीटर लांब आहे.
- सेला बोगदा १३ हजार ५०० फूट उंचीवर असलेला जगातील सर्वात मोठा द्वि-लेन बोगदा असेल.
- टनेल २ मध्ये रहदारीसाठी बाय-लेन ट्यूब आणि एस्केप ट्यूब असेल. म्हणजे मुख्य बोगद्याशेजारी त्याच लांबीचा आणखी एक बोगदा बांधला जात आहे, जो आपत्कालीन परिस्थितीत कामी येईल.
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येत असलेल्या या बोगद्यावर बर्फवृष्टीचा परिणाम होणार नाही.
- प्रकल्पांतर्गत दोन रस्ते ७ किमी आणि १.३ किमीचे बांधले जातील.
हा प्रकल्प धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा का आहे?
- सेला बोगदा ३१७ किमी लांबीच्या बालीपारा-चाहरद्वार-तवांग रस्त्यावर आहे.
- अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग, पूर्व कामेंग आणि तवांग जिल्ह्यांना देशाच्या इतर भागांशी जोडणारा हा एकमेव रस्ता आहे.
- तवांग सेक्टरमधील एलएसीपर्यंत पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग आहे. खराब हवामानात हेलिकॉप्टरही उडू शकत नाही.
- हा रस्ता सर्व हवामानात खुला राहिल्यास स्थानिक लोकांसोबतच भारतीय लष्करालाही हालचाल करता येईल.
- लडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याने केलेले अतिक्रमण पाहता या बोगद्याचे महत्त्व वाढले आहे.
बोगदा प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आली. या प्रकल्पासाठी सुमारे ७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सेला बोगदा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.